कुलगाममध्ये सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक

जम्मू-कश्मीरमधील कुलगाम जिह्यात आज दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. मंगळवारीही कुपवाडा जिह्यातील नाग मार्ग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. येथे दोन दहशतवादी लपून बसल्याचा संशय होता. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला आणि मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला.

उत्तर कश्मीरमध्ये गेल्या आठ दिवसांत सहा चकमकी झाल्या. यापूर्वी बांदिपोरा, कुपवाडा आणि सोपोरमध्ये चकमकी झाल्या. 1 नोव्हेंबरला किश्तवाडमधील केशवानच्या जंगलात चकमक उडाली. सुरक्षा दलांना येथे 3 ते 4 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर लष्कराने शोध घेतला. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्याला पॅरा स्पेशल फोर्सच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात चार जवान जखमी झाले, तर नायब सुभेदार राकेश कुमार हे शहीद झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ग्रेनेड हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेला 5 लाखांची आर्थिक मदत

जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये वर्दळीच्या बाजारपेठेजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी झाले होते. त्यातील अबिदा लोन या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांना जम्मू आणि कश्मीर सरकारने आर्थिक मदत म्हणून 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. ही मदत आज महिलेच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच समाजकल्याण मंत्री सकिना मसुद यांनी बांदिपोरा येथील मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले तसेच मदतीचा धनादेश त्यांना सुपूर्द केला.