स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा! शरद पवारांचे नाव आणि फोटो का वापरता? अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने पुन्हा फटकारले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच अजित पवार गटाला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कठोर शब्दांत फटकारले. शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत; मग विधानसभा निवडणूक लढवताना त्यांचे नाव आणि फोटो का वापरताय? निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःची राजकीय ओळख बनवा, असे सक्त आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले.

अजित पवार गट मतदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव व चिन्हाबाबत संभ्रम निर्माण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयीन आदेशांचे वारंवार उल्लंघन केले जात आहे, याकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने अजित पवार गटाचे चांगलेच कान उपटले. सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांत केल्या जाणाऱया जाहिरातबाजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव आणि फोटोवारंवार का वापरताय, असा खडा सवाल खंडपीठाने केला. याचवेळी अजित पवार गटाला शरद पवार यांचे नाव व फोटोचा वापर न करण्याचे सक्त आदेश दिले. याप्रकरणी 19 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

शरद पवार यांच्या पक्षाचा कोर्टात दावा

अजित पवार गट निवडणुकीत शरद पवार यांचे नाव व फोटोचा वापर करून मतदारांची सहानुभूती मिळवतोय. न्यायालयाच्या आदेशाचे जाणूनबुजून उल्लंघन करतोय. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अजित पवार गटाने ‘न्यायप्रविष्ट’च्या उल्लेखाशिवाय एकही जाहिरात द्यायला नको होती, असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी व अॅड. प्रांजल अग्रवाल यांनी केला. तसेच अजित पवार गटावर कारवाईची मागणी केली. त्यांच्या युक्तिवादाची दखल खंडपीठाने घेतली आणि दोन्ही पक्षांना निवडणुकीवर लक्ष पेंद्रित करावे, अशी टिप्पणी केली.

न्यायालयाचे आदेश काय

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे नाव व पह्टोचा वापर करू नका. यासंदर्भात तातडीने पत्रक जारी करून उमेदवार व कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना द्या. जुन्या व्हिडीओमध्येदेखील शरद पवारांचे नाव व पह्टोचा वापर करू नका, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले. यापूर्वी जाहिरातीत ‘घडय़ाळ’ चिन्हाखाली ‘न्यायप्रविष्ट’ असा उल्लेख करण्याचे आदेश दिले होते.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील फरक मतदार जाणतात

आपल्या देशातील लोक खूप सुज्ञ आहेत. त्यांना मतदान कसे करावे हे माहीत आहे. शरद पवार व अजित पवार यांच्यातील फरक ते जाणतात. राजकीय पक्षांनी न्यायालयीन आदेशाचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. आदेशाचा आदर ठेवला पाहिजे, असे न्यायालयाने अजित पवार गटाला बजावले. मतदार कसा विचार करतील हे आम्ही ठरवू शकत नाही, असेही न्यायालय म्हणाले.