महाराष्ट्र जिंकला की दिल्लीचे तख्तही डगमगेल! उद्धव ठाकरे कडाडले

विधानसभेत शिवसेना आणि महाविकास आघाडीचा विजय इतका दणदणीत झाला पाहिजे की आता महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही हा संदेश दिल्लीत पोहोचला पाहिजे. एकदा महाराष्ट्र जिंकला की दिल्लीसुद्धा हलतेय की नाही तुम्ही बघा. महाराष्ट्र जो काही भूपंप करेल त्याने तडे दिल्लीच्या तख्ताला जाणार आहेत, असा खणखणीत इशारा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. बारसू रिफायनरी होऊ देणार नाही, असे ठणकावतानाच पर्यावरणाचे रक्षण करून रोजगार मिळेल असा कोकणचा विकास करणार, असे वचन यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोकणवासियांना दिले.

विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. आज सिंधुदुर्ग जिह्यातील सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवार राजन तेली, कणकवली मतदारसंघातील संदेश पारकर आणि कुडाळ-मालवण मतदारसंघातील वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांच्या तुफानी सभा झाल्या. कोकण आणि शिवसेनेचे अतुट नाते अधोरेखित करतानाच यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोकणातील गद्दारांना, भ्रष्टाचाऱयांना आणि गुंडागर्दीला गाडून महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून द्या असे आवाहन केले.

पर्यावरण राखून कोकणचा विकास करेन

नाणार रद्द केलाच, आता बारसूची रिफायनरीही होऊ देणार नाही. लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही हे माझे वचन आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मिंधे सांगताहेत आम्ही रिफायनरी आणू, रोजगार देऊ. त्यांचे काय जातेय? त्यांचे बंगले इकडे आणि परदेशात असतील, इथल्या लोकांनी जगायचे कसे? पर्यावरणाचा ऱहास करायचा, खाणी काढायच्या, खोदकाम करायचे, विकासाच्या नावाखाली हिरवेगार छान कोकण आहे ते मारून टाकायचे याला मी विकास मानत नाही. असा विकास मी होऊ देणार नाही. पर्यावरणाचे रक्षण करून कोकणवासीयांना रोजगार मिळेल असा कोकणचा विकास करेन असे वचनही उद्धव ठाकरे यांनी दिले.

आव्हान मर्दांनी द्यायचे असते

उद्धव ठाकरे यांनी रस्तामार्गे कोकणात येऊन दाखवावे अशी धमकी नारायण राणे यांनी दिली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आव्हान मर्दांनी द्यायला पाहिजे. हे कुठले इकडून तिकडून फिरणारे, आज इकडे तर उद्या तिकडे. वाट्टेल तिकडे जातायत वाट्टेल ते बोलताहेत. त्यांनी आव्हान दिले, कोकणात रस्त्याने येऊन आणि रस्त्याने जाऊन दाखवा. हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे, रस्त्याने येऊन जायला तुझ्या डोक्यावर बसलेत ना दिल्लीतले त्यांना म्हणा आधी रस्ता तरी नीट करून दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विकासाला नाही, महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती

महाविकास आघाडी सरकारने विकासाला स्थगिती दिली होती. विकास होऊच देत नव्हते, असे अमित शहा म्हणाले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अमितभाई, विकासाची व्याख्या काय हो. स्थगिती कशाला दिली होती. महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती, असे स्पष्ट करतानाच, यापुढे तर मी बंदीच घालेन त्याच्यावर, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

नतद्रष्ट केसरकर आणि गुंडगिरी करणारे दिवटे पडले तरच कोकणचा विकास होईल

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर वाईटातून चांगले घडेल असे म्हणणारा सावंतवाडीचा नतद्रष्ट दीपक केसरकर आणि कणकवली-मालवणातील गुंडगिरी करणारे दोन दिवटे पडतील तेव्हाच कोकणचा विकास होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेला जबाबदार आहेत त्यांचा सूड घ्या. लोकसभेतला शिवसेनेचा पराभव जिव्हारी लागलाय, त्याचा वचपा काढा, असे उद्धव ठाकरे कडाडले.

मुंबई-गोवा रस्ता व्हायला चारशे वर्षे लागतील

मुंबई गोवा रस्ता अजून होता होत नाही. नितीन गडकरी म्हणाले होते असा रस्ता करेन की दोनशे वर्षांत खड्डा पडणारच नाही. मला अशी चिंता वाटतेय की दोनशे वर्षांत खड्डा पडायला हा रस्ता दोनशे वर्षे होणार तरी आहे की नाही? कारण रस्ता व्हायला दोनशे वर्षे आणि त्याच्यावर खड्डा पडायला दोनशे वर्षे, चारशे वर्षांनंतर कोण कुणाला जाब विचारणार? अशा फालतू भूलथापा मारण्याची यांना सवय झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी तेजस ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संघटक जान्हवी सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अॅड. रेवती राणे, कालिदास कांदळगावकर, शैलेश परब, रूपेश राऊळ, सतीश सावंत, चंद्रकांत कासार, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जो सिंधुदुर्ग उभारला तो ऊन, वारा, पाऊस, वादळ, लाटा, मग ते तौक्ते असेल निसर्ग असेल. मोठमोठय़ा लाटांचा मारा परतवून आणि तेव्हाची परकीय आक्रमणे छातीवर झेलून आजसुद्धा आपल्या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी उभा आहे. आणि हे करंटे, यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्कम पुतळा उभारता येत नाही. शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटले काय, पुतळा लावला म्हणजे लोक मते देतील!

उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवला

औसा आणि वणी पाठोपाठ आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी बांदा इन्सुली चेकपोस्ट येथे तपासणीचे नाटक केले. उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱयासाठी गोवा येथून सिंधुदुर्गच्या दिशेने येत होते. त्यांच्या गाडय़ांचा ताफा इन्सुली येथे आला असता तपासणीसाठी त्यांचा ताफा थांबवण्यात आला. गाडय़ा का थांबवल्या, अशी विचारणा
केली असता, निवडणूक कर्मचारी निरुत्तर झाले.

मोदीजी, घराणेशाही म्हणता मग कोकणात तुमची कोणती शाही आहे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, खरंतर मोदींनाच आपल्याला कोकणात प्रचाराला बोलवायचेय, पण ते माझे ऐकतील की नाही कल्पना नाही. लोकसभेत ते बेंबीच्या देठापासून ओरडत होते. घराणेशाही…घराणेशाही…घराणेशाही. मग इकडे कोकणात तुमच्या भाजपने तीन मतदारसंघात जे काही केलेय ही कोणती शाही आहे? वडिलांना डोक्यावर आणि दोन पोरांना खांद्यावर घेऊन कोकण फिरेल असे तुम्हाला वाटते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. डोक्यावर बाप बसवलाय आणि खांद्यावर पोरं बसवलेय आणि आम्ही चाकरी करतोय त्यांची. ही घराणेशाही नाही तर दुसरे काय. आहे उत्तर मोदींकडे? असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी घराण्याची परंपरा आणि वारसा घेऊन पुढे चालतोय. आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो तसे मोदीजी तुम्ही इथे येऊन इथल्या गुंडांच्या, दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे का, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

मुंबईसारखे उद्या कोकणही अदानीच्या घशात घालतील

सध्या सगळीकडे गौप्यस्फोट होताहेत स्फोटामागे स्फोट गौप्यस्फोट. अजित पवार म्हणाले सरकार स्थापन करण्यासाठी का पाडण्यासाठी जी बैठक झाली त्यात गौतम अदानी होते. मी धारावीचा जो मोर्चा काढला तेव्हा बोललो होतो की आपले सरकार पाडण्यासाठी पन्नास खोके कुणी दिले याचा तुम्ही अंदाज लावा. आता अजित पवार यांनी त्याचा गौप्यस्फोट केला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अदानींवर शरसंधान साधले. या मुद्दय़ावरून त्यांनी राणे पितापुत्रांचाही वेध घेतला. ते म्हणाले की, अदानी सगळीकडे खात सुटले आहेत, मुंबई त्यांनी घशात घालण्याचा डाव आखला आहे. पण तो शिवसेना उधळून लावणार आहे. उद्या कोकण अदानीच्या घशात घातले गेले तर कसे बाहेर काढणार याचा विचार करा. कारण सगळीकडे यांचे घराणे बसले आहे. आहे हिंमत…दाद मागायला तुम्ही यांच्या घरावर टकटक करू शकता? समजा असे होणार नाही पण दुर्दैवाने हे इकडे आणि तिकडे गेले आणि यांचे बाप वर बसलेत. कोकणात असे झाले तर तुमच्यावर अन्याय करणारे पण तेच. ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्याकडे जाण्याची तुमची हिंमत होणार का. अहो तुमच्या काटर्याने आमच्यावर अन्याय केलाय आणि काटर्याला सांगणार का तुझ्या बापाने आमच्यावर अन्याय केलाय. कोणाकडे दाद मागणार? कोण आमदार असणार तुमचा? कोण खासदार आहेत तुमचे? असे सांगत उद्धव ठाकरे यांनी कोकणवासियांना भविष्यातील संभाव्य संकटाबाबत सावध केले.