हिंदुस्थानातील कुस्तीला खोट्या किताबामुळे उतरती कळा लागली आहे. भरपूर खोटय़ा संघटना खोट्या किताबांचे आयोजन करून लोकांची फसवणूक करीत आहेत. ‘रुस्तुम-ए-हिंद कुस्ती संघटने’ने 5 नोव्हेंबरला पंजाब राज्यात नवाशहर जिह्यात कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ‘रुस्तुम-ए-हिंद’ हे नाव वापरले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पैलवान सिकंदर शेख ‘रुस्तुम-ए-हिंद’ किताबाचा मानकरी ठरला. मात्र, ही स्पर्धा बेकायदा असून, सिकंदर शेखचे जेतेपदही बेकायदा ठरले आहे. त्यामुळे या बेकायदा स्पर्धेवर ‘हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघा’ने (आयएसडब्लूएआय) कडक कारवाईचा इशारा दिला आहे. हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष जितेंदर राठी यांनी पत्रकाद्वारे हा कारवाईचा इशारा दिला आहे.
हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघ गेली 68 वर्षे ‘रुस्तुम-ए-हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’ या स्पर्धांचे आयोजन करीत आहे. या तीनही किताबांचे शासकीय नोंद असलेले ट्रेडमार्क आणि कोर्टाची ऑर्डर हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघाकडे आहे. मात्र, 5 नोव्हेंबरला पंजाबमधील नवाशहर जिह्यात ‘रुस्तुम-ए-हिंद कुस्ती संघटने’ने कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ‘रुस्तुम-ए-हिंद’ हे नाव वापरले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल सिकंदर शेखने ‘रुस्तुम-ए-हिंद’ किताब पटकावला. मात्र, आता हा किताब वादाच्या भोवऱयात सापडला आहे. याबाबत दैनिक ‘सामना’ने सिकंदर शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
संघटनेचे महासचिव गौरव सचदेवा म्हणाले, ‘आमचे ‘रुस्तुम-ए-हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’ हे ट्रेडमार्क परवानगीशिवाय वापरणे हे ट्रेडमार्कचे उल्लंघन आहे. त्यासाठी कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे. हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघ कायदेशीर कारवाई करण्यासाठी आता कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करीत असून, लवकरच सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठविणार आहोत,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
रुस्तुम-ए-हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’ किताबामुळे सरकारी नोकरी, शासकीय पेन्शन योजना आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेता येतो. मात्र, काही बनावट संघटना आणि पैलवान याचा गैरवापर करीत आहेत. जे लोक आमच्या किताबाचे नाव स्वतŠच्या नावापुढे वापरून समाजात खोटा नावलौकिक मिळवत आहेत, अशा लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत.’, असं आयएसडब्लूएआय कार्यकारी अध्यक्ष जितेंदर राठी म्हणाले.