सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानी संघ खेळणार नसल्याच्या बातमीने पाकिस्तान क्रिकेट मंडळच (पीसीबी) नव्हे तर आयसीसीही हादरले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद सोडण्याची परिस्थिती पीसीबीवर उद्भवली तर पाकिस्तानी क्रिकेट कर्जबाजारी होईलच, पण त्याचबरोबर प्रसारण हक्कापोटी अब्जावधी रुपयांची कमाई करणाऱया आयसीसीलाही अब्जावधींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. आयोजनाच्या अडचणींमुळे निर्माण झालेला आर्थिक फटका आणि झटका दूर करण्यासाठी दोघेही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असले तरी धक्का बसणार हे निश्चित आहे.
पाकिस्तानी क्रिकेटला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन मुख्य मानले जात होते. पीसीबी गेले वर्षभर या स्पर्धेच्या आयोजनासाठी आपल्या स्टेडियमचे नूतनीकरण करत आहे. त्यांनी 500 कोटींपेक्षा अधिक रक्कम आतापर्यंत स्टेडियमवरील सोयीसुविधांसाठी खर्च केली आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानी संघाच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम होती आणि त्यावर बीसीसीआयने नुकतेच शिक्कामोर्तबही केलेय.
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले तर…
हिंदुस्थानने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिलाय आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्ताननेही हिंदुस्थानचे सामने पाकिस्तानबाहेर खेळवण्यास परवानगी नाकारली आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने स्पर्धा आयोजनाचा निर्णय घेतला तर हा निर्णय यजमान आणि आयसीसी दोघांसाठीही फटका आणि झटक्याचा असेल. हिंदुस्थानशिवाय या स्पर्धेला अपेक्षित प्रेक्षक मिळणार नाहीत. पुरस्कर्तेही धडाधड माघार घेतील. जागतिक क्रिकेटमध्ये तब्बल 80 टक्के वाटा हिंदुस्थानचाच असल्यामुळे त्यांना डावलून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केवळ आर्थिक धोक्याचेच ठरणार, असे अर्थगणित क्रिकेट तज्ञांनी मांडले आहे.
…तर हिंदुस्थानविरुद्ध क्रिकेटच बंद केले असते – लतीफ
हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळासह सर्वच खेळाडूंनाही जबर धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे पाकिस्तानी खेळाडू आपला राग व्यक्त करतानाही काहीही बरळू लागलेत. पाकिस्तानी माजी यष्टिरक्षक राशीद लतीफ म्हणाला, माझ्याकडे अधिकार असते तर मी पाकिस्तानचे हिंदुस्थानशी असलेले क्रिकेट कायमचेच बंद केले असते. तसेच जोपर्यंत हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वाद संपुष्टात येत नाही तोवर दोघांचेही आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळण्याचे अधिकार गोठवायला हवेत आणि दोघांनीही कोणत्याही स्पर्धेचे यजमान पद दिले जाऊ नये, असा सल्लाही लतीफ यांनी दिला आहे. हिंदुस्थानच्या नकारामुळे पाकिस्तानही हिंदुस्थानविरुद्ध खेळणे बंद करू शकतो. लतीफ पुढे म्हणाला, मी या प्रकरणी कुणालाही दोषी मानत नाही. जर तुम्हाला पाकिस्तानात खेळायचे नसेल तर आमच्याविरुद्धही खेळू नका. जर मी तिथे असतो तर मी हा निर्णय घेतला असता आणि बीसीसीआयशीही लढलो असतो.
…तर आयसीसीलाही आर्थिक नुकसान
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रक्षेपणाचे हक्क विकून आयसीसीने स्टार स्पोर्टस् कडून 3.2 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील हिंदुस्थान आणि पाकिस्तान हेच मुख्य आकर्षण आहे. यापैकी एकही संघ खेळला नाही तर आयसीसीला प्रचंड मोठे नुकसान होणार, हे स्पष्ट आहे. क्रिकेट विश्वात याच दोन संघांचे सर्वाधिक क्रिकेट चाहते आहेत. हिंदुस्थानने पाकिस्तानात खेळण्यास नकार दर्शवल्यामुळे भविष्यात पाकिस्तानही हेच पाऊल उचलू शकतो. पुढील सात वर्षांत हिंदुस्थानात आयसीसीच्या महिला वर्ल्ड कप (2025), टी-20 वर्ल्ड कप (2026), चॅम्पियन्स ट्रॉफी (2029) आणि वनडे वर्ल्ड कप (2031) या चार स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून यात पाकिस्तानने अंग काढले तर या स्पर्धांची प्रेक्षक संख्या रोडावू शकते. एवढेच नव्हे तर आयसीसीला प्रसारण हक्कातून मिळणारी रक्कमही कमी होऊ शकते. हे नुकसानही 500 ते 1000 कोटींच्या घरात आहे. हे नुकसान टाळण्यासाठी आयसीसी आणि पीसीबीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पीसीबीला ‘हायब्रिड’शिवाय पर्याय नाही
पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी आपले सर्वस्व पणाला लावलेय. सुमारे 500 कोटींपेक्षा अधिक रक्कम स्टेडियमचे नूतनीकरण आणि अत्याधुनिक सोयीसुविधांसाठी खर्च केलीय. त्यांना स्पर्धेच्या आयोजनातून चार पट फायदा अपेक्षित होता. एक प्रकारे पाकिस्तान क्रिकेटला नवसंजीवनी आणि उभारी देण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले होते. पण बीसीसीआयने पाकिस्तानात न खेळण्याचे जाहीर केल्यामुळे पीसीबी अक्षरशः रडपुंडीला आलीय. पीसीबीने स्पर्धेच्या हायब्रिड मॉडेलचा पर्याय आधीच मोडीत काढल्यामुळे आयसीसीही अडचणीत आहे. बीसीसीआयच्या भूमिकेमुळे पीसीबी आणि पाकिस्तान सरकार संतप्त झाले आहेत. ते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनातूनही माघार घेऊ शकतात किंवा स्पर्धा आयोजन पुढेही ढकलू शकतात. पण स्पर्धेतून माघार किंवा पुढे ढकलणे पीसीबीला फार महागात पडू शकते. त्यामुळे हिंदुस्थानपुढे झुकून हायब्रिड मॉडेलचा पर्याय अवलंबणे, हाच एकमेव मार्ग पीसीबीपुढे उरला आहे.