धकाधकीच्या जीवनशैलीसह उपाशीपोटी राहणे, बैठे काम आणि लठ्ठ मुंबईकरांमध्ये डायबेटिसचे प्रमाण वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे ही स्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून ‘ब्रेपिंग बॅरियर्स, ब्रिजिंग गॅप्स’ मोहीम हाती घेण्यात आली असून मधुमेह टाळण्यासाठी जनजागृती, समुपदेशन, उपाययोजना, उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतŠ प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाइप 2 हा प्रकार वाढून येत आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जागतिक मधुमेह दिननिमित्ताने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पासून मधुमेह आणि आहारविषयक जनजागृती राबविण्यात येणार आहे. मधुमेह दिनाची यंदाच्या वर्षीची संकल्पना ’ब्रेकिंग बॅरिअर्स, ब्रिजिंग गॅप्स’ ही आहे. महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व इतर दवाखान्यामध्ये एक लाखाहून अधिक रुग्ण मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता उपचार घेत आहेत.
असा आहे अहवाल
जागतिक आरोग्य संघटना व बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार 18 ते 69 वर्ष या वयोगटातील सुमारे 18 टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण 126 मिलिग्रॅमपेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. प्री-डायबेटिसची टक्केवारी 15 टक्के आहे. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱया व्यक्तींमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका अधिक असतो.
पालिकेकडून असे होतेय काम
पालिकेच्या माध्यमातून आहारविषयक समुपदेशन सेवा सर्व दवाखान्यांत सुरू असून त्यामध्ये 55 हजारांपेक्षा अधिक मधुमेही व रक्तदाब रुग्णांना सल्ला देण्यात आला आहे. ‘विशेष रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र’ ऑगस्ट 2022 पासून 26 रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आले.
यात, 30 वर्षांवरील व्यक्तींचे व मधुमेह आणि रक्तदाबासाठी सर्वेक्षण केले जाते. ऑक्टोबर 2024 पर्यंत 4 लाख 25 हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संशयितांचा पाठपुरावा करून आवश्यकता असल्यास पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.