गरीबांना पैसे, भेटवस्तूचे आमिष दाखवून मिंध्यांकडून मते विकत घेण्याचा प्रकार; शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मिंधे गट आणि भाजपच्या उमेदवारांच्या मतदारसंघात  भेटवस्तूंचे आमिष दाखवून गरीबांची मते विकत घेतली जात आहेत. वरळीत विधान परिषद उपसभापतींच्या उपस्थितीत वस्तूंचे वाटप झाले, तर जोगेश्वरीतील मातोश्री क्लबवर उघडउघड आचारसंहितेचा भंग करून पालिकेच्या अटीशर्तींचा भंग केला आहे. त्यामुळे जोगश्वरीचा मातोश्री क्लब सील करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आचारसंहितेचा खुलेआमपणे भंग होत आहे. सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे. पोलीस आणि निर्वाचन अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे शिवसेना नेते आमदार अनिल परब आणि खासदार अनिल देसाई यांनी आज निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली.

वरळीत वस्तूंचे वाटप

वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हळदीपुंकुवाच्या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांनी शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचाराचे भाषण करून मते मागितली. फॅन, पंखे, प्रेशर कूकरची या कार्यक्रमात महिलांना कूपन्स वाटली.  कोणत्या ठिकाणावरून या वस्तू घेऊन जाव्यात याच्याही सूचना देण्यात आल्या. या भेटवस्तूंचा साठा असलेले गोडाऊन पकडले. वस्तूवाटपाचे व्हिडीओ शूटिंगही आम्ही केलेले आहे. 10 नोव्हेंबरला तक्रार देऊनही कारवाई झाली नाही, असे अनिल परब म्हणाले.

z शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाने तपासले. या तपासणीला आमचा आक्षेप नाही; पण तपासणीचा व्हिडीओ निवडणूक आयोगाकडून लीक झाला. उद्धव ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न होईल म्हणून त्यांनी स्वतः व्हिडीओ शूटिंग केल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

z मनसेच्या दीपोत्सवात पक्षाचे चिन्ह लावले होते. आचारसंहितेचा भंग झाल्याच्या मुद्दय़ावरून आम्ही तक्रार केली. त्यावरून आमच्यावर टीका केली; पण मोदींच्या सभेसाठी दीपोत्सवातील सर्व दिवे काढायला लावले. त्यावर मनसे गप्प का, असा सवाल खासदार अनिल देसाई यांनी केला.

मातोश्री क्लबवर गुंडांचा मुक्काम

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लबवर मोठय़ा प्रमाणावर काल रात्री पैशाचे वाटप सुरू होते. याबाबत आम्ही पोलीस, निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, पण कोणतीही कारवाई झालेली नाही.  रोहित म्हस्के, तुषार बनकर, समीर शेख, जब्बार, धनंजय शेट्टी असे ‘मोक्का’मधून जामिनावर सुटलेले गुंड मातोश्री क्लबवर काय करीत आहेत? शिवसैनिकांनी पैसेवाटपाचा प्रकार उघडकीस आणला तेव्हा शिवसैनिकांवर खोटय़ा तक्रारी टाकल्या. महिलांचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. शिवसैनिक असा प्रकार कधीच करणार नाहीत. पोलिसांनी क्लबचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. महापालिकेच्या जागेवरील मनोरंजन मैदानासाठी राखून ठेवलेल्या जागेवर मातोश्री क्लब आहे. मातोश्री क्लबवर आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार आम्ही केल्याचे अनिल परब म्हणाले.