महागाईमुळे शेअर बाजार बेजार; सेन्सेक्सची विक्रमी घसरण, गुंतवणूकदारांचे 10.50 लाख कोटी बुडाले

महागाईने 14 महिन्यांतील उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. मात्र महागाईचा परिणाम आता थेट मुंबई शेअर बाजारावरही होऊ लागला आहे. बुधवारी सेन्सेक्सची विक्रमी 984 अंकांनी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 10.50 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

बुधवारी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची घसरण सुरू झाली. बाजार बंद होतानाही सेन्सेक्स सावरला नाही. अखेर 984.23  अंकांनी सेन्सेक्स कोसळून 77690 अंकांवर स्थिरावला. गेल्या 14 महिन्यांतील ही विक्रमी घसरण आहे. एका दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 10.50 लाख कोटी बुडाले. निफ्टीचा अंकही 324.40ने कोसळून 23559वर स्थिरावला.

यामुळे बाजारात अस्थिरता

  • सरकारी आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा ऑक्टोबरचा दर 6.21 टक्क्यांवर गेला आहे. 14 महिन्यांतील हा उच्चांकी दर आहे. प्रामुख्याने अन्नधान्य, खाद्यपदार्थ महागले आहेत.
  • विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री मोठय़ा प्रमाणावर केली जात आहे.
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर समभाग मूल्यांक वाढले. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
  • अनेक कंपन्यांची सरलेल्या तिमाहीत असमाधानकारक कामगिरी.