वार्तापत्र- दहिसरमध्ये भाजपविरोधात लाट

>> देवेंद्र भगत 

दहिसरमध्ये गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा आमदार असताना कोणताही विकास झाला नसल्याने मतदारांमध्ये भाजपविरोधात नाराजी असल्याने यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विनोद घोसाळकर यांना प्रचारादरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ-सुंदर, प्रगतशील आणि विकास साधणारे दहिसर बनवण्याचा ध्यास घेऊन घोसाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे दहिसरमध्ये शिवसेनेच्या घोसाळकर यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या दहिसरमध्ये  बहुभाषिकांनी  नेहमीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच शिवसेनेचे विनोद घोसाळकर 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र यानंतर 2014 मध्ये भाजपच्या ‘चुनावी जुमल्या’मुळे मनीषा चौधरी सलग दोन वेळा निवडून आल्या. मात्र दहिसरचा कोणताच विकास झाला नसल्याने सहापैकी चार शिवसेनेच्या नगरसेवकांना दहिसरकरांनी निवडून दिले. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण दहिसरकरांना रुचलेले दिसत नाहीय. शिवाय शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सर्व घटकपक्षांच्या एकजुटीमुळे घोसाळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

घोसाळकरांची 40 वर्षांची जनसेवा

विनोद घोसाळकर हे गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण करीत आहेत. त्यामुळे या भागात झालेली मोठमोठी क्रीडांगणे, रस्ते, स्विमिंग पूल, उद्याने ही शिवसेनेची देण ठरली आहे. घोसाळकर हे 1985 ते 1992 या कालावधीत नगरसेवकही राहिले आहेत. त्यांनी विभागप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.

असा आहे विकासाचा अजेंडा

विभागातील सर्व बसथांब्यांवर शेडची व्यवस्था.

भरतीत पेपर फोडून तरुणांची फसवणूक करणाऱयांची पोलखोल

दहिसर भगवती रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा

रेल्वे पात्र झोपडपट्टीवासीयांचे पुनवर्सन करणार

कांदळवन संरक्षणासाठी संरक्षक भिंत बांधणार

गणपत पाटील झोपडपट्टीवासीयांचे एसआरए धर्तीवर पुनर्वसन

दहिसर चेकनाक्याच्या ठिकाणी पार्किंग टर्मिनल.

दहिसर नदीच्या सौंदर्यीकरणाचा रखडलेला प्रकल्प मार्गी लावणार

मुंबईतील पुनर्विकासासाठी स्वतंत्र कायदा बनवण्यासाठी काम

खड्डेमुक्त दहिसर आणि मॅग्रोव्हज् पार्कची निर्मिती करणार.

दहिसर पश्चिमेत सुसज्ज क्रीडा संकुल.

बचत गटासाठी महिला भवनाची निर्मिती.

पिण्याचे पुरेसे आणि मुबलक पाणी उपलब्ध करणार.