वायनाड मध्ये 60.79 टक्के मतदान; 10 राज्यातील 31 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण

केरळच्या वायनाड लोकसभा जागेसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. वायनाडमध्ये 60.79 टक्के मतदान झाले आहे. तसेच 10 राज्यांच्या 31 विधानसभा जागांत्या पोटनिवडणुकीसाठीही मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. या जागेवरील उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. आता 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहे.

10 राज्यातील विधानसभेच्या 31 जागांसाठी 10 राज्यांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात राजस्थानमध्ये 7 जागा, बिहारमध्ये 4 जागा, मध्य प्रदेशात 2 जागा, छत्तीसगडमध्ये 1 जागा पश्चिम बंगालमध्ये 6 जागा, आसममधील 5 जागा, कर्नाटकातील 3 जागा, मेघातलयातील 1 जागा आणि केरळमधील 2 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

या मतदानावेळी काही राज्यात प्रक्रियेला गालबोट लागले आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील जगतदल भागात काही लोकांनी बॉम्बफेक केली आणि टीएमसी नेते अशोक साहू यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. राजस्थानमधील देवली-उनियारा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी एसडीएम अमित चौधरी यांना थप्पड मारली. ते सामरावता मतदान केंद्रात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होते. बिहारमधील तरारी विधानसभा जागेवर मतदानावरून दोन पक्षांमध्ये हाणामारी झाली. दोन गटात झालेल्या मारामारीत सहा जण जखमी झाले आहेत.

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रियंका गांधी वाड्रा भाजपच्या नव्या हरिदास आणि लेफ्टचे सत्यन मोकेरी यांच्या विरोधात लढत आहेत. प्रियंका वायनाडमधील एका बूथवर पोहोचल्या आणि त्यांनी लोकांची भेट घेतली. वायनाड लोकसभा जागेसाठी 60.79 टक्के तर छत्तीसगडच्या रायपूर दक्षिण जागेवर सर्वात कमी मतदान झाले.