टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाला खूप लवकर राग येतो…; रिकी पॉण्टिंगची खोचक प्रतिक्रिया

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वी मैदानाबाहेर शाब्दिक फटकेबाजी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीबद्दल मत मांडणाऱ्या रिकी पॉण्टिंगला गौतम गंभीर यांनी फटकारले होते. त्यानंतर रिकी पॉण्टिंगने पुन्हा एकदा गौतम गंभीर यांना डिवचण्याचा प्रयत्न करत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाला खूप लवकर राग येतो, असे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने 7news या चॅनलला दिलेल्या मुलाखती दरम्यान गौतम गंभीर संदर्भात विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, मला प्रतिक्रिया वाचून आश्चर्य वाटले, परंतु मी गौतम गंभीरला ओळखतो. तो खूप लवकर चिडतो त्यामुळे त्याने प्रतिउत्तर दिले याचे मला आश्चर्य वाटले नाही. मला त्यांच्याकडून अशी काही अपेक्षा नाही. आमचा एकमेकांविरुद्ध खूप इतिहास आहे. मी गौतम गंभीरला दिल्ली कॅपिटल्समध्ये असताना प्रशिक्षण दिले आहे. तो खूप बडबड्या स्वभावाच आहे, असे रिकी पॉण्टिंग म्हणाला.

“मी कोणत्याही प्रकारे विराटवर टीका केली नाही. मी म्हणालो की त्याने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली असून तो पुनरागम करण्यास उत्सुक असेल. जर तुम्ही विराटला विचारले, तर मला खात्री आहे की तो थोडासा चिंतेत असेल, त्याने मागील वर्षांसारखी यावर्षी शतके झळकावली नाहीत, असे रिकी पॉण्टिंग म्हणाला आहे.

विराट कोहलीचा सध्याच्या फॉर्मवरुन रिकी पॉण्टिंग याने चिंता व्यक्त केली होती. यावरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्या शौलीत रिकी पॉण्टिंगचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होती की, पॉण्टिंगचा हिंदुस्थानी क्रिकेटशी काय संबंध? त्यांनी विराटची आणि हिंदुस्थानी संघाची काळजी करण्याऐवजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटची काळजी करावी, असा सल्ला गौतम गंभीर यांनी पॉण्टिंगला दिला होता.