झारखंडमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपन्न, 43 जागांवर किती टक्के झालं मतदान? जाणून घ्या

Jharkhand Election Voting: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 43 जागांसाठी मंगळवारी मतदान संपन्न झालं आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.86 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

याचबद्दल माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी सांगितले की, 43 विधानसभा मतदारसंघात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आज सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले आणि शांततेत मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. ते म्हणाले की, 950 बूथवर मतदान 4 वाजता संपले, पण इतर मतदान केंद्रांवर मतदान 5 वाजता संपले. या 43 विधानसभा मतदारसंघातील मतदान संपेपर्यंत 64.86 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बहरगोरा विधानसभेच्या जागेवर राज्यात सर्वाधिक 76.15 टक्के मतदान झाले आहे. रांची जिल्ह्यातील पाच जागांवर बोलायचे झाले तर एकूण 60.49 टक्के लोकांनी मतदान केले. या जिल्ह्यात मंदार विधानसभेच्या जागेवर सर्वाधिक मतदान झाले. येथे 72.13 टक्के मतदान झाले. यानंतर तामार जागेसाठी 67.12 टक्के मतदान झाले. हातिया विधानसभा जागेवर 58.20 टक्के लोकांनी मतदान केले. तर कानके विधानसभा मतदारसंघ 57.89 टक्के मतांसह चौथ्या स्थानावर राहिला. या बाबतीत रांची पिछाडीवर असून, येथे फक्त 51.50 टक्के मतदान झाले. मात्र, निवडणूक आयोगाची अंतिम यादी जाहीर झाल्यावर या आकडेवारीत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.

याआधी मंगळवारी सायंकाळपर्यंत मतदान कर्मचारी नियुक्त केलेल्या बूथवर पोहोचले. 17 सर्वसाधारण जागांसाठी, 6 अनुसूचित जाती आणि 20 अनुसूचित जमातीच्या जागांसाठी एकूण 683 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 609 पुरुष, 73 महिला आणि एका तुतीयपंथी उमेदवाराचा समावेश आहे.