पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी पक्षफोडीच्या राजकारणावरून मिंधे आणि फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले आहेत की, एकनाथ शिंदे यांनी 30 ते 40 आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीला जाऊन बसले. शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही मंत्रिमंडळात होते. असं असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली. लोकांना हे पटलेलं नसून देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठं काम काय केलं? असं विचारलं असता ते पक्ष फोडला म्हणून सांगतात. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असं म्हणत शरद पावर यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
सभेला संबोधित करता शरद पवार म्हणाले की, ”2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते. मात्र घटना धोक्यात असल्याने तुम्ही आमचे 31 खासदार निवडून दिले. आता भाजप आणि आमच्यातल्या फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे.”
ते म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले.”