सावंतवाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. प्रंचड जनसमुदाय या सभेसाठी जमला होता. आता कोकण गुंडापुंडाच्या, दरोडेखोरांच्या हातात देऊ नका, कोकणाता डौलाने भगवा फडकवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. कोकणात महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने विजयी होणार आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार म्हणजे होणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
आपण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. आता तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. कोकणचे आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचे प्रयत्न करण्यात आला. संभ्रम निर्माण करण्यात आला. इथल्या काही भागात मतदानाच्या दिवशी एका मैदानात टेबल टाकण्यात आले होते. ते कशासाठी होते, ते तुमच्या लक्षात आले असेल. यावेळीही तसेच होऊ शकते. त्यामुळे सावध राहा.टेबल फक्त त्या दिवसासाठी होती, पण तुम्ही तुमचे आयुष्य त्यांच्या हातात दिले आहेत. शिवसेना आणि कोकण हे नाते अतूट आहे. आता आमचे अनेकजण परत आल्याने आमची ताकद वाढली आहे. आपले कोकण गुंडापुंडाच्या हातात देऊन चालणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. तुमची मुलेबाळे कोकणात अभिमानाने जगले पाहिजे, ते कोणाचेही गुलाम, नोकर व्हायाला नको.
मनात वखवख असलेले स्वतःला कोकणचे सुपुत्र समजतात असे राज्यकर्ते दुर्देवाने आहेत. त्यांची वखवखच थांबतच नाही. आपले उमेदवार राजन तेली यांनाच जनता आमदार करणार आहेत, त्यात काहीच शंका नाही. मात्र, सध्याचे आमदार ज्यांनी आपणच मोठे केले, ते खाली मुंडी पाताळधुंडी, ते नेहमीच खाली बघूनच बोलूनच बोलतात. त्यांनी काही आव आणला होता. आपल्याला वाटते चांगला माणूस आहे, सज्जन आहे. ते शिर्डीला जातात. पण साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी मंत्र त्यांना समजलेला नाही. त्यांच्याकडे श्रद्धाही नाही, आणि सबुरीही नाही. मनात नाही भाव, देवा मला पाव, कसा पावणार देव त्यांना, असा टोलाही त्यांनी लगावला.
घाई गडीबडीत पैसा खाऊन, भ्रष्टाचार करून त्यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभरला, तो कोसळला. या गोष्टीचा सर्वात जास्त आपल्याला संताप आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएमचे मशीन नाही. कोकणची जनता भोळी आहे. त्यांनी शिवभक्तीचा आव आणला. पंतप्रधान मोदी स्वतः पुतळ्याच्या उद्घाटनाला आले. ते महाराजांचे भक्त आहेत, असे जनतेला वाटले. मात्र, ते भक्त नसून डाकू, दरोडेखोर आहेत, हे जनतेला समजले आहे. 350 वर्षे झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुग किल्ला ऊन, वारा, पाऊस, लाटा यांचा सामना करतही जशाच्यातसा उभा आहे. दाढीवाले मिंधे म्हणतात की, वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. लाज वाटते तुम्हांला राज्यकर्ते म्हणायला. इथले खाली मुंडी, पाताळधुंडी आमदार म्हणतात की, पुतळा कोसळला हे वाईट झाले. त्यातूनच काहीतरी चांगले घडेल. पुतळा कोसळला, यानंतर अजून काय चांगले होणार, असा सवालही त्यांनी केला.
त्यांच्या डोक्यात मेंदू आहे की कचरा आहे, त्यांना दुर्बुद्धी सुचली. त्यातून त्यांनी हे वक्तव्य केले. पुतळा कोसळला हे चांगले झाले नाही. त्यातून काय चांगले होणार, असे म्हणणे दुर्दैवी आहे. केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गात चांगले होणार आहे. त्यांचा खाणीवाला हॉटेलावाला मित्र आहे, टिमलो त्यांच्याचरणी लाज, लज्जा, शकम वाहून टाकली काय, असा सावलही त्यांनी केला. इथे आपण ज्या गोष्टी करणार होतो, त्या अद्याप का झाल्या नाही, याचे उत्तर द्या, त्यानंतर आम्ही काय केले, तुम्ही काय केले, असा सवाल करा. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आपण परवानगी दिली, पैशांची मंजुरी दिली होता. अद्यापही हॉस्पिटल झाले नाही. आपले सरकार आल्यानंतर हॉस्पिटल होणारच, याची जबाबदारी मी घेतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यांचे मित्र टिमलो कोकण- कोल्हापूर सीमेजवळ जागा शोधत होते, कशासाठी, एखादा विनाशकारी प्रकल्प आणण्यासाठी, शाळा- कॉलेज उभारणीसाठी तर नाही. ते अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी जागा शोधत होते, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. याची खात्री तुम्ही करा. अदानीचे दलाल बनून तुम्हा कोकणात येता. कोकणवासीयांना फसवत आहात. कोकणच्या हक्क्याच्या जागा हिसकावून, ओरबाडून सर्व अदानीच्या चरणी वाहून टाकायचे. आपल्या हक्काची मुंबई ते अदानीच्या घशात घालत आहे. आपले सरकार येणार म्हणजे येणारच आणि सरकार आल्यानंतर अदानीच्या घशात घातलेली जमीन परत घेणार. त्या जागेवर गिरणी कामगारांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देणार, गिरणी कामगारांना कोणीही वाली नाही. अदानीचे दलाल सबका मालिक अदानी, सब कुछ अदानी असे म्हणतात. साईबाबा काय सांगत होते, सबका मालिक एक आणि हे म्हणतात सबका आलिक अदानी आहे. माझ्या कोकणचे आदानीकरण आपण कदापीही होऊ देणार नाही.
शेती, भातपिके,कांदा, पाकूस, सोयबीन सर्व शेतकरी हतबल झाले आहे. आता निवडणूक जवळ आल्यावर त्यांना पान्हा फुटला, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असे ते म्हणत आहे. मात्र, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवले होते. सरकार पाडले नसते, तर पुन्हा करून दाखवले असते. आपले सरकार आल्यानंतर पुन्हा कर्जमुक्त करून दाखवणार आहे, तसेच हमीभाव देण्याचेही वचन मी तुम्हाला देत आहे, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.
आता त्यांनी ज्या योजना आणल्या आहेत, ते लोकसभेच फटके पडल्यामुळे आणल्या आहेत. इथेही फटके द्यायला हवे होते. इथे नको तो माणूस डोक्यावर का घेतला हेच आपल्याला समजले नाही. तो काळ आठवा, कशी गुंडागर्दी होती. 2004-2005 या काळात आपण मतदारसंघात बसलो होतो. भयाण शांतता, भीती आणि दहशत होती. एका ठिकाणी एक तरूण म्हणाला, तुम्ही इथे आलात, निवडणुका झाल्यानंतर तुम्ही निघून जाल, आम्ही इथे राहतो, आमचा वाली कोण, उद्या यांनी काही केले तर आम्हाला कोण वाचवणार, एखाद्या माणूस आम्हाला द्या, जे इथे ठाण मांडून बसेल आणि आमचे रक्षण करेल. तेव्हापासून विनायक राऊत येथे ठाण मांडून आहेत. कधीकाही झाले तर ते धावून जात होते. कोकणने पुन्हा उभारी घेतली, ती तशीच ठेवायची की परत एकदा दरोडेखोरांचा हातांमध्ये तुमचे आयुष्य द्यायचे, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आम्ही तळमळीने बोलतो कारण इथे सुरू असलेल्या गोष्टी बघवत नाही.
आज मुंबईतील हजारो एकर जमीन त्यांनी अदानीच्या घशात घातली आहे, उद्या त्यांनी तुमच्या काजूबागा, आबांबागा, साताबारा यावर ते अदानीचे नाव टाकणार नाही, हे कशावरून, तुम्ही कोणाकडे दाद मागणार कोणाकडे? हे भूत उभं राहतंय ते आताच गाडले नाही, तर पुढे आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. आपण मिळूनच आपलं कोकण वाचवण्याची गरज आहे. ते महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहून टाकत आहेत. उद्या ते मंत्रालयाही गुजरातला नेतील. या गोष्टी आताच आपल्याला थांबवाव्या लागतील.
आमच्या वचननाम्यातील आश्वासने आम्ही पूर्ण करणारच. पाच जीवनावाश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, मुलांनाही मोफत शिक्षण देणार, 25 लाखांपर्यंत कॅशलेस वैद्याकीय सेवा देण्यात येणार आहे. महिलांना 3000 देण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला अधिकारी असलेली पोलीस ठाणी उभारली जातील. हे सर्व हवे असेल तर तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल, ते 15 लाख देणार होते, ते 1500 का देत आहे. आतापर्यंत फक्त गद्दारांना भाव होता. आता निवडणुकीत फटका बसल्यानंतर त्यांच्या फसव्या योजना पुन्हा बाहेर येत नाही. त्यांची आश्वासने म्हणजे जुमलानामा आहे.
आपण मुख्यमंत्री झाल्यावर रायगडाला निधी देणे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हा आपला पहिला निर्णय होता. कोणीतरी आव्हान दिले की हेलिकॉप्टरने येऊ नका, रस्त्याने या आणि रस्त्याने जा. आम्ही रस्त्यानेच येतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आदित्य ठाकरे तेथे गेले होते. तेव्हा शिवद्रोही व्यक्तींनी ठणणा केला. ते शिवद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहेत. आमच्या आरोप करा, ते राजकारण आहे, पण त्यांची काळीकृत्ये खूप झाली. गेल्यावेळी कसेबसे त्यांचे घोडे गंगेत न्हाले. मात्र, आता पुन्हा ही चूक होऊ देऊ नका. कोकणात भगवा डौलाने फडकला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवरा पक्ष आघाडीचा धर्म पाळत आहेत. मात्र, काहीजण बडंखोरी करत महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करत आहेत. ते कशासाठी हे पाप करत आहेत. ते बंडखोरी करत नसून महाराष्ट्राशी केलेली गद्दारी आहे. तुम्ही पापाचे धनी होऊ का, कोकणच्या जनतेच्या आशिर्वादाचे धनी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. मोठे स्वप्ने बघा, वैक्तीगत स्वप्नासाठी बंडखोरी, महाराष्ट्राशी गद्दारी करून नका. महाराष्ट्रप्रेमींची मते महाराष्ट्रद्रोह्यांच्या पदरात पाडू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
आता कोकणात चांगली सुरवात होणार आहे. आता आपल्या हातात मशाल आहे, त्यामुळे आता अंधार होण्याची भीती नाही. मशाल धगधगत ठेवा आणि कोकणात भगवा डौलाने फडकू द्या. महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून येणारच आहेत, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.