आपली एकच राष्ट्रवादी ओरीजनल, बाकीचे काॅपीवाले; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला टोला

आपली एकच राष्ट्रवादी ओरीजनल, बाकीचे काॅपीवाले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या प्रचारार्थ अहेरी येथे आयोजित सभेत बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

आपली लेक भाग्यश्री आत्राम यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाग्यश्री आत्राम यांच्याबद्दल त्यांच्या वडिलांनी केलेले वक्तव्य प्रचंड वेदना देणारे आहे, असंही त्या म्हणाल्या. या भागातील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भाग्यश्री आत्राम यांना मदत करु, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी उपस्थित नागरिकांना दिलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील लाडक्या बहिणींचा महालक्ष्मी म्हणून सन्मान करेल. आपली एकच राष्ट्रवादी ओरीजनल आहे. बाकीचे काॅपीवाले आहेत. अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करणार. एक मोठी बहिण म्हणून मी भाग्यश्री आत्राम यांच्या पाठीशी कायम उभी राहीन, असा शब्द त्यांनी दिला.

अहेरी मतदारसंघाच्या विकासासाठी मतदान यंत्रावरील क्रमांक दोनवरील ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून भाग्यश्री आत्राम यांना सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी येथील सभेत नागरिकांना केलं.