जुनागडमधील गिरनार लीली परिक्रमा दरम्यान 48 तासात 9 जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. परिक्रमासाठी भक्तांची अलोट गर्दी लोटली होती. यामुळे गर्दी आणि गरमी यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचे जुनागड सिव्हिल रुग्णालयाचे सुप्रिटेंडन्ट डॉ. कृतार्थ ब्रम्हभट्ट यांनी सांगितले. मृतांमध्ये राजकोटच्या 3, मुंबई-अहमदाबाद-गांधीधाम-देवला आणि अमरासर येथील प्रत्येकी एका भाविकाचा समावेश आहे.
दरवर्षी कार्तिकी एकादशीपासून गिरनार लीली परिक्रमा सुरू होते. यंदा भव्य परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते. परिक्रमा सुरू होण्याच्या 24 तास आधीच भक्तांची गर्दी तेथे जमली. कार्तिकी एकादशी दिवशी मध्यरात्रीपासून साधु-संत आणि अधिकाऱ्यांनी परिक्रमा मार्गाचे पूजन करून भक्तांचे प्रस्थान केले. या परिक्रमेसाठी दरवर्षी 20 लाखांहून अधिक भक्त येतात आणि परिक्रमेदरम्यान चार दिवस, तीन रात्री जंगलात घालवतात.
गिरनार पर्वताला हिमालयाचा पितामह म्हणतात. या पर्वताच्या गुहेत भगवान शंकराने पार्वतीचा शोध लावला असे मानले जाते. सुमारे 5200 वर्षांपूर्वी श्रीकृष्ण आणि रुक्मणी यांनी पहिल्यांदा या पर्वताची प्रदक्षिणा सुरू केली, तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.