टेलिग्राम अॅपचा सीईओ पावेल ड्युरोव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने तो 100 मुलांचा जैवीक पिता असल्याचे जाहीर केले आणि जगाला चकित केले. आता त्याने महिलांच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे करत अनोखी ऑफर दिली आहे. ड्युरोव याने ज्या महिला स्पर्म डोनरची गरज आहे त्या महिलांसाठी मोफत आयव्हिएफ ट्रिटमेण्ट करण्याची ऑफर देऊ केली आहे,शिवाय मॉस्को येथील अल्ट्राविटा फर्टिलिटी क्लिनिकच्या सहकार्याने या संपूर्ण प्रक्रियेचा खर्च तो वैयक्तिकरित्या उचलणार असल्याचे त्याने सांगितले आहे .
पावेल ड्युरोव याने आपल्या या अनोख्या ऑफरविषयी अल्ट्राविटा फर्टिलिटी क्लिनिकच्या संकेतस्थळावर माहिती आहे. या संकेतस्थळानुसार ही ऑफर जगभरातल्या प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजकांपैकी एक असलेल्या पावेल ड्युरोव याच्या स्पर्मने आई होण्यासाठी आहे. मात्र त्यासाठी तुमचे वय 37 पेक्षा कमी असावे तसेच ही ऑफर मर्यादित काळापुरता आहे. शिवाय यामध्ये अट एकच आहे की ही सुविधा तुम्हाला फक्त आमच्या क्लिनिकमध्येच मिळेल.
ड्युरोवच्या म्हणण्यांनुसार, या ऑफर मागे त्याचा कुठलाही हेतू नाही. तो केवळ लोकांना त्यांचे कुटुंब वाढविण्यासाठी मदत करणार आहे. आल्ट्राविटा फर्टिलिटी क्लिनिकच्या म्हणण्यांनुसार, यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यात येईल, ज्यामध्ये आरोग्य तज्ज्ञ आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. इच्छुक महिला समुपदेशनासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकतात.
याआधी सीईओ पावेल ड्युरोव याने खुलासा केला होता की, गेल्या 15 वर्षांत त्याच्या शुक्राणूपासून 100 हून अधिक मुले जन्माला आली आहेत. त्यानंतर 15 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेबद्दलही त्याने सांगितले की, त्याच्या एका मित्राच्या विनंतीवरून तो स्पर्म डोनर कसा बनला आणि लग्न न करता डझनभर मुलांचा जैविक पिता बनला. ड्युरोव यांनी सांगितले की, एका मित्राने त्याला सांगितले की, प्रजनन समस्यांमुळे त्याला मुले होऊ शकत नाही. अशा स्थितीत मित्राने त्याला शुक्राणू दान करण्याची विनंती केली. ड्युरोव म्हणाला, सुरुवातीला फारसे मनावर घेतले नाही मात्र नंतर मी मदत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने स्पर्म डोनेट करणे सुरू ठेवले.