2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला होता. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजप व राष्ट्रवादीमध्ये युतीसंदर्भात झालेल्या चर्चेला उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यामागे गौतम अदानींचाच हात असल्याची कबुलीच अजित पवार यांनी दिली असे म्हटले आहे.
बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलतान संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासंदर्भात दिल्लीत झालेल्या बैठकीला गौतम अदानी हजर होते. गौतम अदानी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत सरकार पाडण्याचा कट शिजला. आम्ही अडीच वर्ष चांगल्याप्रकारे सत्ता राबवली. पण अदानींना हे सरकार नको होते. ही मुंबई, हा महाराष्ट्र त्यांना गिळायचा, विकत घ्यायचा आणि ओरबाडायचा आहे. म्हणून मोदी, शहांनी शिवसेना तोडली आणि त्यासाठी अदानींचा वापर केला हे अजित पवारच सांगताहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यामागे अदानींचा हात होता हे अजित पवार कबुल करत आहेत. मुंबई, महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव मोदी, शहा, फडणवीस यांनी खेळला आणि तो यशस्वी झाला. म्हणून आमची लढाई गौतम अदानी आणि त्यांच्या व्यापारी वृत्तीविरुद्ध आहे. मोदी, शहा, शिंदे, फडणवीस आणि अदानी एकच आहेत. राज्याची सूत्र अदानीला हातात हवी म्हणूनच उद्धव ठाकरे सरकार पाडले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
छगन भुजबळ यांनी शिवसेनेबाबत केलेल्या विधानावरही राऊत यांनी भाष्य केले. शिवसेना मंडलविरोधी आहे म्हणून मी पक्ष सोडते असे कारण देऊन छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला. त्यामुळे शरद पवारांनी पक्ष फोडला की अदानीने फोडसा हे अजित पवारांना विचारा. महाराष्ट्रातले सरकार अदानीने पाडले आणि शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यामागे अदानी, मोदींची हातमिळवणी आहे हे स्वत: अजित पवार कबुल करत असल्याचेही राऊत म्हणाले.
मोदी, शहांची गाडी तपासून दाखवा; एकतर्फी कारवाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला संजय राऊत यांचं आव्हान
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगतपासणीवर टिप्पणी करणाऱ्या राज ठाकरे यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. भाजप, फडणवीस यांनी तुम्हाला पैसे दिलेले असून सुपाऱ्या घेतात त्यांच्याकडेच पैसे असतात. आमच्याकडे कुठून असणार. आमचे सरकार अदानीने पाडले. अजित पवार यांनीच याची कबुली दिली. याचा अर्थ आमची कोणत्याही उद्योगपतीशी हातमिळवणी नाही. मुंबई विकली जाऊ नये, अदानीच्या हातात जाऊ नये म्हणून आम्ही लढलो आणि आमचे सरकार पाडले. अदानीशी हातमिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत, हेलिकॉप्टरमध्येही पैसे असते, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.
View this post on Instagram