बीसीसीआयने हिंदुस्थानी क्रिकेट संघ पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर करताच भेदरलेले पाकिस्तान क्रिकेट मंडळही (पीसीबी) या स्पर्धा आयोजनातून माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पीसीबी आणि आयसीसीशी यांच्यात चर्चा सुरू असून, पीसीबीने शेवटच्या क्षणी आयोजनातून माघार घेतली, तर यूएई आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांनी स्पर्धा आयोजनाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे हिंदुस्थान संघ पाकिस्तानात न खेळो किंवा पाकिस्ताननेही आयोजनातून माघार घेतली तरी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी नियोजित कार्यक्रमानुसारच होणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत.
हिंदुस्थानी संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार नसल्याचे बीसीसीआयने आयसीसीला कळवले. त्या क्षणापासून फेब्रुवारी-मार्चदरम्यान पाकिस्तानात होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेवर अनिश्चिततेचे संकट पसरले आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पाकिस्तानात न खेळण्याचे जाहीर केल्यामुळे पाकिस्तानी सरकारही याप्रकरणी पीसीबीला आयोजनातून माघार घेण्याचे आदेश देऊ शकतो. 2017 सालानंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार होते आणि या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी पीसीबीला देण्यात आली होती. पीसीबीनेही स्पर्धेच्या दिमाखदार आयोजनासाठी आपल्या स्टेडियमचे युद्धपातळीवर नूतनीकरणही सुरू केले आहे.
काहीही झाले तरी स्पर्धा होणार!
हिंदुस्थानच्या नकाराबद्दल आयसीसीकडून पीसीबी पत्राची मागणी करीत आहे. तसेच ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत हिंदुस्थानचे सामने आणि अंतिम सामना दुबईत खेळविण्यासाठी पीसीबीला विचारणा करू शकते. पण, पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी आधीच हे मॉडेल फेटाळून लावल्यामुळे आयसीसीला ही पूर्ण स्पर्धाच स्थलांतरित करावी लागू शकते. असे झाल्यास पाकिस्तानही चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनातून बाहेर फेकला जाऊ शकतो. म्हणजेच पाकिस्तानही स्पर्धेतून अंग काढू शकते किंवा आयसीसीही त्यांना नुकसानभरपाई देत आयोजनापासून दूर करू शकतात. याचाच अर्थ काहीही झाले तरी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या ठरलेल्या वेळेनुसार नव्या वर्षात होणार.
मोहम्मद शमी आला रे! हिंदुस्थानला दिलासा, बॉर्डर-गावसकर क्रिकेट ट्रॉफीत खेळण्याची शक्यता
स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवा
आयसीसीने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळविण्याबाबत पीसीबीकडे उत्तर मागितले आहे. पीसीबीला ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवणे मान्य आहे का, असा प्रश्न केला आहे. ज्यात हिंदुस्थानचे सर्व सामने आणि अंतिम सामना दुबईत खेळविला जाऊ शकतो. त्याचबरोबर या सर्व सामन्यांची मॅच फी आणि अधिक सामने आयोजनांची संधी दिली जाईल; मात्र आयसीसीच्या या प्रश्नाला पीसीबीकडून नकार मिळण्याचीच अधिक शक्यता आहे.