ज्वेलर्समध्ये दागिने खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 9 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेखर हेमराज वाणी (वय 32, रा. मांजरी, हडपसर) आणि शिवानी दिलीप साळुंखे (वय 24, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. अकलुज, ता. माळशिरस) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
कॅम्प परिसरातील ज्वेलर्समध्ये 31 ऑक्टोबरला खरेदीच्या बहाण्याने महिलेसह दोघांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी हातचलाखी करून सेल्समनची नजर चुकवून दागिन्यांची चोरी केली. ज्वेलर्समधून खरेदी न करता दोघेही निघून गेले. दरम्यान, काही वेळानंतर ज्वेलर्समध्ये चोरी झाल्याचे सेल्समनच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, महिलेसह पुरुषाने हातचलाखीने 95 हजारांचे दागिने चोरल्याचे दिसून आले. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी सीसीटीव्हीतील दुचाकीची माहिती घेतली. त्यांनी केलेला प्रवास ट्रेस करीत पथकाने मुंढव्यातील केशवनगर गाठले.
आरोपी महिलेच्या घरासमोरील घरात दोन दिवस वास्तव्याला राहून पोलिसांनी तपासाला गती दिली. दोघेही घरात असल्याचे दिसून येताच, छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत शेखर आणि शिवानीने चोरी केल्याची कबुली दिली. दोघांनी मिळून यापूर्वी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येकी दोन, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी एक, असे 9 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, एपीआय विशाल दांडगे, महेश कदम, संदीप उकिर्डे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, हराळ, कोडिलकर, अल्का ब्राम्हणे यांनी केली.