शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. आधी वणी येथे आणि नंतर औसा येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या. याचा व्हिडीओही समोर आला असून एकतर्फी कारवाईवरून निवडणूक आयोगावर टीकेचा भडिमार होत आहे. यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून गरज पडल्यास मोदी, शहा यांची गाडीही तपासू असे म्हटले. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहांची गाडी तपासून दाखवाच, असे आव्हान निवडणूक आयोगाला दिले आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग आणि त्यांच्या लोकांवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती गेल्या 5-10 वर्षात आम्ही पाहिली नाही. तपासण्या, नाकाबंदी करणे हे त्यांचे काम आहे. पण त्यांच्या कारवाया एकतर्फी आहेत हे आपण गेल्या 3 वर्षात पाहिले. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला, कायद्याचे उल्लंघन करून शिवसेना पक्ष, चिन्ह फुटीर गटाच्या हातात दिले आणि जे निवडणूक आयोग प्रत्येक बाबतीत मोदी, शहांच्या दबावाखाली काम करत आहे त्यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही.
निवडणूक काळामध्ये राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणे हे चुकीचे आहे असे नाही. पण जे पैशाचे वाटप, आदान-प्रदान होते ते उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगेतून नेतात का? हा कॉमन सेन्सचा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून कशाप्रकारे बॅगा वाहत होते हे आम्ही दाखवले होते. त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर, विमान यांची झडती घेण्याचा हा खेळ लोकांना कळतो, असेही राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, लोढा यांना जिथे पैसे पोहोचवायचे होते त्यांनी तिथे ते पोहोचवले आहेत. अगदी पोलीस बंदोबस्तात, पोलिसांच्या गाडीतून पोहोचवले आहेत. या गाड्या कुठे थांबवल्या, त्यांची झडती घेतली असे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे गरज पडल्यास अमित शहा, नरेंद्र मोदींची गाडी तपासून दाखवू म्हणणाऱ्यांनी करून दाखवावे, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
मोदी-शहा यांची बॅग इथून जाताना तपासा, महाराष्ट्र लुटून नेत आहेत; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
दरम्यान, मुंबईतील वरळी, जोगेश्वरी, दादर या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून पैसे, वस्तुंचे वाटप सुरू असल्याचे समोर आले आहे. यावरून जोगेश्वरीमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटात राडाही झाला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दादर, मिलिंद देवरा निवडणूक लढताहेत त्या मतदारसंघात आणि जोगेश्वरीमध्ये सर्रासपणे पैशाचे वाटप सुरू आहे. वस्तुंचे वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे. शिवसैनिक किंवा महिला शिवसैनिक तिथे जाऊन धाड घालतात तेव्हा राडा होतो. निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी कारवाई करायला हवी, पण ते काही करत नाही, असा आरोपही राऊत यांनी केला.
View this post on Instagram