न्याय, मानवी प्रतिष्ठेवर आधारलेला महाराष्ट्रधर्म टिकवून ठेवा! महाविकास आघाडीला मतदान करण्याचे मान्यवरांचे आवाहन

महाराष्ट्र राज्यात 15व्या विधानसभेसाठी होऊ घातलेली निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला आम्ही पूर्ण पाठिंबा व्यक्त करत आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या ‘न्याय’ आणि ‘मानवी प्रतिष्ठा’ या मूल्यांवर आधारित महाराष्ट्रधर्म टिकून राहावा यासाठी सर्व सुजाण मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करावे, असे जाहीर आवाहन समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.

पेंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारांचा मुळातच ना संविधानिक प्रक्रियेवर विश्वास आहे ना लोकशाहीवर. त्यामुळे संसदीय कार्यपद्धतीला पूर्णपणे धाब्यावर बसवून त्यांचा कारभार सुरू आहे. इंग्रजांच्या ‘पह्डा आणि झोडा’ या नीतीचा यथेच्छ वापर करून समाजातील स्वास्थ्य आणि सुरक्षितता बिघडवून टाकली जाते आहे. आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजात दुही माजवली जाते आहे. खाजगीकरण आणि अभूतपूर्व अशा भांडवली मत्तेदारीला पाठिंबा देणाऱ्या या सरकारचे आरक्षण प्रेम किती बेगडी आहे हे सांगायची अधिक आवश्यकता नाही.

लोकशाही मूल्यांना तिलांजली देणारे सरकार नको!

देशाबाहेरील काळा पैसा आणून 15 लाख देऊ, असे सांगून आता 10 वर्षे उलटली, महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी प्रति आमदार 50 खोके वाटून दोन पक्ष पह्डले गेले. लोकशाही मूल्यांना तिलांजली देत सरकार स्थापन केले. या पातकावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी आता निवडणुकीच्या तोंडावर महिन्याला 1500 रुपयाची ‘लाडकी बहीण योजना’ आणली गेली आहे. ही जनतेची खुलेआम फसवणूक आहे. या मत्तेदार भांडवली, जात-जमातवादी आणि हुकूमशाही सरकारांच्या विरोधात दीर्घकालीन आणि अल्पकालीन लढा लढावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्याद्वारे महायुती सरकारची हकालपट्टी ही अग्रक्रमाची बाब आहे, असे आम्ही मानतो, म्हणूनच महाविकास आघाडीला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत, अशी भूमिका अर्जुन डांगळे, डॉ. प्रज्ञा पवार, कॉ. सुबोध मोरे, अभय कांता, शशिकांत हिंगोणेकर, डॉ. मनोहर जाधव, किशोर मेढे, संभाजी भगत, सुरेश केदारे, दिवाकर शेजवळ, बंधुराज लोणे, शोभा बागूल, डॉ. श्रीधर पवार, पद्मश्री सुधारक ओलवे, रमेश शिंदे, डॉ. जी. के. डोंगरगावकर, एकनाथ जाधव, रमेश जाधव, डॉ. महेंद्र भवरे, डॉ. सुनील अवचार, जयमंगल धनराज, रमेशचंद्र कांबळे, विश्वनाथ बोरकर, शिवा इंगोले, जयदेव गायकवाड, नाना अहिरे, भीमराव बनसोड, श्रीकांत तळवटकर, चंद्रकांत तळवटकर, समाधान इंगळे या मान्यवरांनी घेतली आहे.