विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार निवडणुकीत उभे करून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्या ‘रायगडच्या राजकीय पॅटर्न’चे लोण आता राज्यभरात पसरले आहे. राज्यातील 288 पैकी 55 हून अधिक विधानसभा मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाचेच उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणातील मुख्य उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.
रायगड जिह्यात साधारणतः 1990च्या आसपास निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांची विभागणी करण्यासाठी नामसाधर्म्य असलेले उमेदवार अपक्ष म्हणून उभे करण्याची सुरुवात झाली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षी पाटील या उमेदवार होत्या. त्याचवेळी मीनाक्षी पाटील नावाच्या सहा उमेदवार अपक्ष म्हणून अलिबागमधून निवडणूक लढवत होत्या. या सहा अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांचा फायदा काँग्रेस उमेदवाराला झाला होता. निवडणुकीत मतांची विभागणी होण्यासाठी हाच रायगड पॅटर्न सर्वत्र वापरला जात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. येथे जयंत पाटील नावाचे दोन उमेदवार असून त्यापैकी एका उमेदवाराचे नाव जयंत राजाराम पाटील असे आहे. अजित पवार गटाने येथून निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या नावाशी साम्य असलेले दोन उमेदवार रिंगणात आहेत. अलिबाग मतदारसंघात मिंधे गटाच्या महेंद्र दळवी यांच्या नावाशी साम्य असलेले तीन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. कर्जतमध्ये मिंधे गटाचे महेंद्र थोरवे आणि उरणमध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
4 रोहित पाटील
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे चिरंजीव पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. येथे रोहित आर. पाटील नावाचे तीन उमेदवार आहेत.
दोन राम शिंदे
नगर जिह्यातील कर्जत-जामखेडमध्ये भाजपच्या प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यात लढत असून येथे राम शिंदे नावाचे दोन, तर रोहित पवार नावाचा एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे.
दोन नवाब मलिक
मानखुर्द- शिवाजीनगरमध्ये अजित पवार गटाचे नवाब मलिक हे अधिकृत उमेदवार असून येथेही नवाब मलिक नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. चांदिवलीमध्ये मिंधे गटाचे दिलीप लांडे यांच्या नावाशी साम्य असणारा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दिकी यांच्या नावाशी साम्य असणारा अपक्ष निवडणूक लढवत आहे.
नवी मुंबईत बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक यांच्यात मुख्य लढत आहे. येथे मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक नावाचे अपक्ष उमेदवार आहेत. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे राजेश वानखेडे याच नावाचे राजेश वानखेडे अपक्ष उभे आहेत.
दापोली मतदारसंघात मिंधे गटाचे योगेश कदम या नावाशी तंतोतंत साम्य सांगणारा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. याशिवाय आणखी एक उमेदवार आहे. शिवसेनेचे संजय वसंत कदम यांच्या नावाशी साम्य असलेले दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम आणि राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांच्या नावाशी साम्य असलेले उमेदवार आहेत.
कोल्हापूर जिह्यातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सत्यजित बाबासाहेब पाटील निवडणूक लढवत आहेत. येथे सत्यजित पाटील नावाचे दोन अपक्ष उमेदवार आहेत. सांगलीत जयश्री पाटील नावाच्या तीन उमेदवार आहेत.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे निवडणूक लढवत असलेल्या मुक्ताईनगरमधून दोन रोहिणी खडसे अपक्ष म्हणून उभ्या आहेत. तसेच मिंधे गटाच्या चंद्रकांत पाटील यांच्या नावाचे दोन उमेदवार अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत.
विदर्भातील बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, तिवसा, सावनेर मराठवाडय़ातील लोहा, गंगाखेड, परळी, परांडा, पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, आंबेगाव, दौंड, मावळ, वडगावशेरी, करमाळा, माढा येथेही हीच स्थिती आहे. कोरेगावमध्ये मिंधे गटाच्या महेश शिंदे यांच्या नावाशी साम्य असलेले तीन अपक्ष उमेदवार आहेत.