लोकसभा निवडणुकीत गैरव्यवस्था व अन्य कारणांमुळे मतदानाची टक्केवारी घसरली होती. आता विधानसभेतही मतदान प्रक्रिया कासवगतीने व्हावी असे षड्यंत्र रचले गेले असल्याचा आरोप होत आहे. जुन्या व्हर्जनच्या व्हीव्हीपॅट मशीन्स त्यासाठी कारणीभूत आहेत. या मशीनमधून मतदान केल्याची चिठ्ठी बाहेर पडताना लाईटअभावी दिसत नसल्याने एकेका मतदाराला मतदान करण्यास बराच विलंब लागू शकतो. यासंदर्भात शिवसेनेने निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रार केली आहे.
शिवडी विधानसभा मतदारसंघात हा प्रकार निदर्शनास आला आहे. तिथे आज मतदानासाठी वापरल्या जाणाऱया बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट मशिन्सच्या तपासणीवेळी अनेक व्हीव्हीपॅट मशिन्समधून मतदान केल्यानंतर ते कोणाला केले हे दर्शवणारी स्लिप खाली पडताना दिसली नाही. त्यासंदर्भात शिवडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजय चौधरी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे आज लेखी तक्रार केली.
काही व्हीव्हीपॅट मशिन्स भेल पंपनीच्या तंत्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जुन्या व्हर्जनच्या आहेत. त्यात मतदाराला मतदान केल्यावर कोणाला मतदान केले हे दिसत असले तरी स्लिप खाली पडताना दिसत नाही. कारण त्या वेळी मशीनमध्ये लाईट पेटत नाही. त्यामुळे मतदाराला त्याने केलेल्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे समजणार नाही.
…तर मतदान न करताच मतदार निघून जातील
अशा स्थितीत आपल्या मतदानाची खात्री करण्यासाठी मतदार मतदान पेंद्रात जास्त वेळ उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान पेंद्रांवर मोठय़ा रांगा लागतील आणि अनेक मतदार पंटाळून मतदान न करता निघून जातील, अशी शक्यता अजय चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
नवीन व्हर्जनच्या व्हीव्हीपॅट मशिन्समध्ये ही तक्रार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी भेल पंपनीच्या तंत्रज्ञांशी चर्चा करून यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.