आजारी असल्याचे सांगून जामीन घेतला आणि आता मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढवत आहेत, असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
अजित पवार गटाकडून नवाब मलिक निवडणूक लढवत आहेत. त्याचा तपशील याचिकेत नमूद करण्यात आला आहे. जामिनावर असताना ते न्यायालयाने लादलेल्या अटींचे पालन करत नाहीत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
नाशिक येथील समसन पाठारे यांनी ही याचिका केली आहे. ईडीने 2022मध्ये नवाब मलिकांना अटक केली. आजारी असल्याचे कारण देत मलिक यांनी जामिनासाठी अर्ज केला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जामिनाच्या अटी उच्च न्यायालयाने द्याव्यात असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार कोर्टाने मलिक यांना अटी घातल्या.
किडनी उपचाराचे कारण देऊन मलिकांनी जामीन घेतला. मात्र ते उपचारासाठी कोणत्याही रुग्णालयात दाखल झाले नाहीत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
साक्षीदारांना आमीष दाखवतील
नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. ते जामिनावर राहिले तर साक्षीदारांना आमीष दाखवतील. पुराव्यांशी छेडछाड करतील, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.