उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करा, तरच निवडणुका जिंकू! ‘आप’च्या संजय सिंह यांचे स्पष्ट मत

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त काम केले आहे. कोरोनाकाळात मुंबई, महाराष्ट्र त्यांनी उत्तमप्रकारे सांभाळला. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या जातात. निवडणूक प्रचारादरम्यान योग्य मुद्दे ते उपस्थित करत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावे. तरच महाराष्ट्रात निवडणूक जिंकू, असे स्पष्ट मत आप नेते, खासदार संजय सिंह यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीने आताच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे नाव घोषित करावे. त्यांनी विलंब केला तर निवडणुकीत नुकसान होईल. हरयाणामध्ये हेच झाले की काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले, त्यात काँग्रेसचे नुकसान झाले. त्यामुळे माझे म्हणणे आहे. नंबरवाल्या खेळामध्ये तुम्ही फसू नका. महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने महायुतीला हरवणे हे लक्ष्य सर्वांनी ठेवले पाहिजे आणि तसा प्रयत्न झाला पाहिजे, असे स्पष्ट मत सिंह यांनी व्यक्त केले. आतापर्यंत आपण बाईकचोर व इतर चोर पाहिले, पण भाजपने तर पक्ष चोरला… अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर त्यांना सोबत घेतलं, हे लोक पाहताहेत, असे सिंह म्हणाले.

 हवेत राहू नका

हरयाणातील निवडणुकीत कॉँग्रेस हवेत राहिली तसे हवेत राहू नका. तिथे काँग्रेसमधील गटांनी एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न केला. हरयाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर उद्धव ठाकरे यांना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावे, असे संजय सिंह म्हणाले.