महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतका द्वेष पसरवला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी द्वेषपूर्ण घोषणा केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ अशी द्वेष करणारी घोषणा दिली. परंतु आता हे द्वेषाचे लोण थेट विवाहसोहळय़ात पोहोचले आहे. गुजरातमध्ये एका व्यक्तीने लग्न पत्रिकेवर ‘बटेंगे तो कटेंगे’ छापले आहे. गुजरात राज्यातील भावनगर जिह्यातील भाजप कार्यकर्त्याने ही विवाहपत्रिका छापली आहे.
सर्वात आधी हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी हिंदू-मुस्लिम समाजाला उद्देशून घोषणा केली होती. परंतु आता महाराष्ट्रासह झारखंडच्या प्रचारात भाजपने ही घोषणा दिली आहे. त्यांच्या या वादग्रस्त घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदांवरील व्यक्तींनी दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे विधान करू नये, अशी घटनेत तरतूद असतानासुद्धा योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि पंतप्रधान मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’, अशी द्वेषपूर्ण घोषणा केली आहे. परंतु यावर निवडणूक आयोग अद्याप मूग गिळून गप्प आहे. लग्नपत्रिका गुजराती भाषेत ‘बटेंगे तो कटेंगे’ असा द्वेषपूर्ण मजूकर छापलेली लग्नपत्रिका ही गुजराती भाषेत छापली आहे. हरेश आणि आशा असे नववधू-वराचे नाव असून त्यांचा शुभविवाह 13 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.