जरांगेंच्या अपमानाची किंमत महायुतीला मोजावी लागणार, अमित देशमुख यांचा थेट इशारा

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारले. परंतु, मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान महायुतीला करता आला नाही. त्यांचा सन्मान करण्याऐवजी महायुतीतील नेत्यांनी मनोज जरांगे आणि आंदोलक यांचा अवमान करण्याचे काम केले. या सर्वांची किंमत महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीत मोजावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी मंगळवारी दिला.

सांगलीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी देशमुख हे सांगलीत आले होते. या वेळी त्यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ‘लाडकी बहीण’ प्रकरणी खासदार धनंजय महाडिक यांनी जे आक्षेपार्ह विधान केले त्याचा काँग्रेस आणि मी जाहीर निषेध करतो. महाडिकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, असा जबरदस्त टोला देशमुख यांनी यावेळी लगावला. महाविकास आघाडी सध्या महाराष्ट्र अस्मितेची लढाई लढत आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या काळात महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. राज्यात आणि देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, असेही ते म्हणाले.