दापोली विंटर सायक्लोथॉनच्या सहाव्या पर्वाला उत्साहात सुरुवात; परदेशी सायकलपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेची रंगत वाढली

दापोली सायकलिंग क्लबतर्फे दापोली विंटर सायक्लोथॉन सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या दापोली सायक्लोथॉनच्या सहाव्या पर्वाचा शानदार शुभारंभ परदेशी स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोलीत मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील आणि परदेशातील वय वर्षे 8 ते वय वर्ष 64 वयोगटातील 120 स्पर्धक आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते.

सायकल स्पर्धा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुळ गाव असलेल्या चिखलगाव मार्गे दाभोळ, पंचनदी, गोमराई, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, आसुद येथून दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील 64 किमी मार्गावरील कोकणातील निसर्ग सृष्टी सौंदर्य अनुभवत सहभागी सर्वांनी सायकल चालवत स्पर्धा यशस्वी केली. 1000 मीटरहून अधिक चढ उतार असणाऱ्या या आव्हानात्मक हॉर्नबिल सिनिक रुट मार्गावर सायकल चालवणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये मलेशिया देशातून आलेले 64 वर्षीय एस सांगरन, 60+ वयोगटातील नितीन मुळे (लोहगाव), राजू औटी (पुणे), मेजर दीपक जांभळे (सासवड), विनायक वैद्य (खेड), वर्षा येवले (कल्याण), रोहित आंबेकर आणि वांडरर्स टीम (पनवेल), टँडम सायकलने पूर्ण करणारे आनंद ठाकर (पाषाण. सिंगल गिअर सायकलने पूर्ण करणारे निलेश गावकर (कणकवली सिंधुदुर्ग) इत्यादींना खास सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच 64 किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वार 13 वर्षीय आयुष शिंदे, अवधूत पाते, वरद कदम, स्वराज मांजरे, साईप्रसाद वराडकर, आयुष जोशी, प्रमोद जैन हे ठरले. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी काहीजण सायकल चालवतच मुंबई तसेच पुणे येथून दापोलीत आले होते. तसेच सायकल प्रवास करत दापोलीत पोहोचलेले इंग्लंड येथील डेव्हिड आणि जेट यांनीही स्पर्धकांसोबत सायकल चालवत त्यांचे अनुभव कथन केले.

या सायक्लोथॉनसाठी दापोली एज्युकेशन सोसायटी, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, दापोली तालुका आरोग्य अधिकारी, दापोली पोलीस इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. 17 नोव्हेंबर 2024 रोजी शॉर्ट सिटी लूप राईड आणि फॅन राईड असणार आहे. त्यामध्ये सुध्दा सर्वांनी सहकुटुंब सहभागी व्हावे व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे, आवाहन दापोली सायकलिंग क्लब तर्फे या निमित्ताने करण्यात आले.