विधानसभा निवडणुकीत ‘बीएलए’ला (मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी) मतदान केंद्रात प्रवेश देऊ नका, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचे प्रतिनिधी व ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख यांनी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवले आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये कुणाला प्रवेश दिला जाईल याचे निकष ठरवण्यात आले आहेत. उमेदवारांसाठी निर्देश पुस्तिकादेखील प्रकाशित केली असून त्यात ‘बीएलए’ला प्रवेश देण्याची तरतूद नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात काही मतदान केंद्रांवर सर्रासपणे बीएलएचे ओळखपत्र दाखवून काही व्यक्ती मुक्त संचार करीत होत्या, असा दावा मधुकर देशमुख यांनी पत्रात केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात काही मतदान केंद्रांवर प्रवेशामुळे वाद झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी व तसे आदेश कर्मचाऱ्यांना द्यावेत, अशी मागणीदेखील शिवसेनेने केली आहे.
पान क्रमांक 86 वर काय म्हटले आहे?
मतदान केंद्रांमध्ये कुणाला प्रवेश द्यावा याचे स्पष्ट निर्देश ‘उमेदवार निर्देश पुस्तिका 2023’ मध्ये देण्यात आले आहेत. या पुस्तिकेतील पान क्रमांक 86 वर असलेल्या कलम (ह) मध्ये म्हटले आहे : ‘मतदारांना ओळखण्याकरिता किंवा मतदानाच्या प्रक्रियेत मतदान केंद्र अध्यक्षाला सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्र अध्यक्ष वेळोवेळी त्यांना प्रवेश देऊ शकेल अशी व्यक्ती’. या निकषामुळे वाद निर्माण होण्याची तसेच नियमाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्यामुळे कलम ‘ह’ रद्द करावे अशी मागणी मधुकर देशमुख यांनी केली आहे.