राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, चिखलीची सभा रद्द; व्हिडीओ शेअर करत दिला महत्त्वाचा संदेश

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आजही राहुल गांधी यांची बुलढाण्यातील चिखली आणि गोंदिया येथे सभा होती. मात्र राहुल गांधी यांची चिखलीतील सभा रद्द झाली आहे.

राहुल गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज बुलढाण्यातील चिखली येथे जाहीर सभा होणार होती. मात्र ही सभा रद्द झाली आहे. राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते या सभेला पोहोचू शकणार नाहीत. त्यांच्याऐवजी प्रभारी रमेश चेन्नीथला आणि सचिन पायलट हे चिखलीमध्ये सभा घेतली. तर राहुल गांधी हे दुसऱ्या विमानाने थेट गोंदियाला पोहोचतील आणि संबोधित करतील. याच संदर्भात राहुल गांधी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी चिखलीसह महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. ‘मला आज चिखलीला यायचे होते. तिथे सोयाबीन शेतकऱ्यांची भेट घेऊन सभेला संबोधित करायचे होते. मात्र विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मला पोहोचता आले नाही’, असे म्हणत राहुल गांधी यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

मला माहित आहे की महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंडिया आघाडी सरकार तुमची काळजी घेईल आणि तुमच्या समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले.