नियमांचे उल्लंघन आणि महापालिकेची फसवणूक करून जाहिरातबाजी करणाऱ्या मिंधे गटाचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला 44 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ठाण्यात बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारला असून मंजुरीपेक्षा अधिक आकाराचे नियमांचे उल्लंघन करत उभारलेल्या फलकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतापी आमदाराकडून पालिका पैसे वसुली करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
गेली अनेक वर्षे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या होर्डिंग व्यावसायिकांसह चुकीची स्थळ पाहणी अहवाल देणाऱ्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता संदीप पाचंगे यांनी केली. त्यानंतर कारवाई न झाल्याने त्यांनी जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे कारवाईला गती मिळाली. महापालिकेने 52 जाहिरात फलकांवर कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेनंतर सर्वत्र होर्डिंग्जच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना ठाणे महापालिकेने केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या कारवाईत मिंधे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या विहंग कंपनीला 44 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ठोस धोरणाची गरज
या कारवाईमुळे बेकायदेशीर होर्डिंग रोखण्यास मदत होईल आणि शहराचे सौंदर्य टिकून राहील. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होणार नाही. होर्डिंग्जच्या नियंत्रणाबाबत ठोस धोरण आखून कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.