भारतीय जनता पक्षाचा विरोध डावलून अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढवत असून सातत्याने भाजपविरोधात विधानं करत आहेत. भाजपला नडणे आता त्यांना भोवण्याची शक्यता असून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
नवाब मलिक यांनी मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. जवळपास दीड वर्ष ते तुरुंगात होते. मात्र मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार आमदारांचा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठींबा दिला.
नवाब मलिक यांना सरकारमध्ये घेण्यास भाजपने विरोध केला होता. इतकेच नाही तर त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात येऊ नये अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली होती. मात्र भाजपचा हा विरोध डावलून अजित पवार यांनी नवाब मलिक आणि त्यांच्या मुलीलाही उमेदवारी दिली. तेव्हापासून नवाब मलिक हे भाजपविरोधात बोलत आहेत. आता याचाच फटका त्यांनी बसण्याची शक्यता आहे.
ईडीने नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वस्थामुळे तात्पुरता जामीन मिळाला होता. मात्र अंतरिम जामिनाचा त्यांच्याकडून गैरवापर झाल्याचे म्हणत ईडीने हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.