ऐरोलीत गावांची पहिली पसंती एम. के. मढवींना; गणेश नाईकांवर प्रचंड नाराजी

शहराची निर्मिती होऊन अर्धशतक उलटले तरी गावठाण विस्तार आणि गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे हे भूमिपुत्रांचे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. 1990 पासून आतापर्यंत गणेश नाईक हे पाच वेळा आमदार झाले आहेत. मात्र भूमिपुत्रांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे नाईकांवर प्रचंड नाराज असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार एम. के. मढवी यांना पहिली पसंती दिली आहे. दिघ्यापासून कोपरीपर्यंत प्रत्येक गावात मढवी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भूमिपुत्रांनी मोठी मोर्चेबांधणी केली आहे.

ऐरोली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार गणेश नाईक हे नवी मुंबईतील प्रस्थापित नेते आहेत. महापालिकेची सत्ता स्थापनेपासून त्यांच्याकडेच आहे. 1990 पासून आतापर्यंत ते पाच वेळा आमदार झाले आहेत. इतका मोठा सत्तेचा इतिहास असतानाही त्यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना कधीच हात घातला नाही. गावांच्या सीमा निश्चित झाल्या नाहीत. गावठाण विस्तार हा फक्त आश्वासनांपुरताच झाला. गरजेपोटी वाढवलेली घरे कायम करण्याबाबत कोणताच तोडगा निघालेला नाही. पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर ही सर्व पदे घरात असतानाही हे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यात नाईकांना अपयश आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात भूमिपुत्रांमध्ये नाराजी उफाळून आली आहे.