मोठी दुर्घटना टळली! निवडणूक विभागाच्या गाडीचा अपघात, विद्युत खांबाला धडक देत वाहन शेतात पलटली

ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील वृद्ध व अपंग मतदारांची मतदान प्रक्रिया पार पाडणारे पथक क्रं. 5 चे निवडणूक विभागाचे कर्मचारी चारचाकी वाहनाने नवरगाव – चिमूर मुख्य मार्गाने जात असतांना अचानक नवरगाव – रत्नापूर फाटा मार्गावरील मातोश्री विद्यालयाजवळ गाडी विदयुत खांबाला धडक देत शेतात जावून पलटली . यात निवडणूक विभागाचे 3 कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी, एक फोटोग्राफर व गाडीचालक असे सहा जणांचा समावेश होता. अपघातग्रस्त वाहनातील अपघात ग्रस्तांना किरकोळ जखमां झाल्या असून मोठी दुर्घटना टळली आहे. सदर घटना रविवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.

विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवारासह निवडणूक विभाग निवडणूक कामात व्यस्त झाले आहेत . ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील वृद्ध व अपंग अशा व्यक्तींच्या मतदान प्रक्रियेचे काम घरोघरी जावून सुरू करण्यात आले असून ब्रम्हपूरी येथून निघालेले चारचाकी वाहनात निवडणूक विभाग पथक क्रमांक 5 निवडणूक विभागाचे कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिंदेवाही – चिमूर मुख्य मार्गाने झायलो एमएच 34 , सीएस 3291 या चारचाकी वाहनाने नवरगावला येत असतांना नवरगाव – रत्नापूर फाटा मार्गावरील मातोश्री विद्यालयाजवळ डाव्या बाजूने चालणारे चारचाकी वाहन अचानक उजव्या बाजूला जावून विद्यूत खांबाला धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जावून पलटली . कसेबसे सर्वजण गाडीच्या बाहेर निघाले मात्र घटनेत कुणालाही मोठी दुखापत झाली नाही तसेच विद्यूत खांबासहीत विद्यूत तारा तुटल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेची माहीती वाऱ्यासारखी पसरताच बघ्याची गर्दी निर्माण झाली होती तसेच वाहतूकीचा मार्ग असल्याने काही काळ वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. या घटनेतील वाहनात निवडणूक विभागाचे कर्मचारी हरिदास राणे, क्रिष्णा किरमीरे, आशिष रामटेके, पोलीस कर्मचारी देविदास रणदीवे, फोटोग्राफर समीर वासनिक, तसेच वाहनचालक राजू मेश्राम यांचा समावेश होता. अपघातानंतर अपघातग्रस्तांची दवाखान्यात नेवून तपासणी व उपचार करण्यात आले. कुणालाही मोठी जखम झाली नसून किरकोळ जखमां झाल्याने निवडणूक कामाच्या कर्तव्यावर असणारे कर्मचारी सुखरूप बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात गाडीचे स्टेअरींग लॉक झाल्यामुळे झाल्याचे वाहन चालक राजू मेश्राम यांचे म्हणणे आहे .