<<< यामिनी पानगावकर >>>
समुद्राविषयी सगळ्यांनाच आकर्षण असते. शालेय अभ्यासक्रमात समुद्र शब्दाची ओळख होते. कन्याकुमारीला तीन समुद्रांचा समूह बघण्यात येतो. साहित्यातील समुद्र म्हटला तर कुसुमाग्रजांच्या ‘किनारा तुला पामराला’ कवितेत समुद्र आढळतो. तारुण्यात ‘जिथे सागरा धरणी मिळते’ या गाण्यातून समुद्र आपल्याला साथ करीत असतो. पण समुद्राची सखोल माहिती आपण करून घेत नाही. समुद्रात विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, सागरी जिवाणू, विषाणू, जलचर, प्रवाळ, नद्या, जंगल, ज्वालामुखी, खनिजे, किनारे, सागरी अन्नसाखळी अशा असंख्य गोष्टी बघायला मिळतात. या सगळ्यांची ओळख या पुस्तकातून होते. त्याचबरोबर समुद्रातील तापमान, भरती-ओहोटी, मान्सून, पर्जन्यमान, सागरी वादळे, सागरी प्रदूषण, मत्स्यविज्ञान अशा समुद्र विज्ञानाशी संबंधित सखोल माहिती या पुस्तकात आहे.
समुद्रावर फिरायला जाणे, बोटिंग करणे, क्रूजवरची सफर करणे, सबमरीनमध्ये बसणे, कॅटेमरीन, स्पीड बोटमधून फिरून येणे, स्कूबा ड्रायव्हिंग, अंडर सी वॉक करणे अशा समुद्राशी निगडित करमणुकीच्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. परंतु यापलीकडे जाऊन समुद्राची वैज्ञानिक अगदी जुजबी माहिती सर्वसामान्य लोकांना असते. या पुस्तकामुळे अतिशय अनोखी माहिती आपल्याला अचंबित करून टाकते. सात शीर्षकांच्या खाली एकूण 51 लेख आहेत. समुद्र साक्षरता यात समुद्र विज्ञानाचा अभ्यास, भूमध्य व तांबडा समुद्र, आखात, उपसागर व कालवे, समुद्रातले विविध प्रदेश, महत्त्वाच्या महासागरांचे क्षेत्रफळ किती, त्यांची खोली किती याविषयीची माहिती मिळते.
भौतिक समुद्रशास्त्रमध्ये सागरी प्रवाह, सागरी तापमान, लाटा, भरती-ओहोटी, मान्सून प्रक्रिया यांबद्दल यात वाचायला मिळते. रासायनिक समुद्रशास्त्र यामध्ये सागराच्या पाण्यात विरघळलेले वायू, पाण्याची क्षारता, सागरी खनिजे यांबद्दल रासायनिक माहिती आहे. जैविक समुद्रशास्त्र यात सागरी अन्नसाखळी व अन्न जाळे, महासागरातील विषाणू, जिवाणू, पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी, खारफुटी आणि वालुकामय, चिखलयुक्त, खडकाळ या तिन्ही किनाऱ्यांवरील जीवसृष्टी यावर सविस्तर माहिती दिली आहे.
समुद्रसंबंधित समस्या या प्रत्येक माणसाने वाचल्याच पाहिजेत. समुद्र पातळीची वाढ, हवामानातील बदल, समुद्रातील भराव, नैसर्गिक आपत्ती व सागरी प्रदूषण – तेलगळतीमुळे होणारे, प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होणारे. याचबरोबर समुद्राचा आणि ध्वनी प्रदूषणाचा काय संबंध, त्याचा काय परिणाम होतो हे सगळे आवर्जून वाचायलाच हवे.
मानव व समुद्र आंतरसंबंध हे किती विविध घटकांशी निगडित आहेत हे यातून समजते. जमिनीवरील शेती, सागरी दळणवळण, सागरी आर्थिक क्षेत्र आणि भूराजकीय वर्चस्व, खोल समुद्रातील खनिज उत्खनन, सागरी मासेमारी आणि मत्स्यशेती याबद्दलची अतिशय उपयुक्त माहिती यातून समजते. महासागर कुतूहलाच्या गोष्टी यातील सगळे लेख खूपच रंजक माहिती देणारे आहेत. सागराची निर्मिती, सागराची निळाई, बर्म्युडा त्रिकोणाचे रहस्य, रात्री लखलखणारे समुद्रकिनारे, प्रवाळांची मनोहरी दुनिया, शिंपल्यातील मोती, नील आरोग्य, निळेध्वज असलेले समुद्रकिनारे असे लेख यात आहेत. सागराची निळाई वाचताना ‘थोडी सागर निळाई, थोडे शंख ही शिंपले’ नक्कीच आठवेल. या लेखातील रविराज गंधे यांचा रंगांचा अभ्यास थक्क करणारा आहे. बँकॉक, मॉरिशस अशा ठिकाणी समुद्राखालील प्रवाळ बघितले होते. पण त्यांच्या मनोहारी दुनियेची दीपलक्ष्मी पुजारी यांनी फारच सुंदर माहिती दिली आहे. डॉ. नंदिनी देशमुख यांनी समुद्राच्या सान्निध्यात राहून सुधारलेले आरोग्य यावर खूप छान लिहिले आहे. त्यासाठी वापरलेला ‘नील आरोग्य’ हा शब्दही अगदी योग्य ठरतो. डॉ. नंदिनी 30 वर्षे सागरी संशोधक आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांनी व या पुस्तकाच्या निमित्ताने समाजामध्ये समुद्र साक्षरता निर्माण व्हावी हीच अपेक्षा.
महासागर (समुद्र विज्ञानाची परिपूर्ण ओळख)
संपादन : रविराज गंधे, डॉ. नंदिनी देशमुख.
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठ संख्या : 260 किंमत : 400 रुपये.