<<<गुरुनाथ तेंडुलकर>>>
ज्या ग्रंथाच्या योग्य अभ्यासातून केवळ सनातन हिंदू धर्मीयांचंच नव्हे, तर अखिल मानवजातीचं कल्याण साधलं जाऊ शकतं असा हा केवळ सातशे श्लोकांचा महाग्रंथ भगवद्गीता.
एखाद्या पुस्तकात किती पानं आहेत किंवा किती शब्द आहेत यावरून त्या पुस्तकाची योग्यता ठरत नसते, तर त्यातील विचार किती योग्य आणि तर्कसंगत आहेत हे फार महत्त्वाचं असतं. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायाच्या म्हणजेच सांख्ययोगाच्या अभ्यासाला आपण आता सुरुवात केली आहे. या अध्यायात विनाशी देहातील अविनाशी आत्म्याबद्दल जे काही विवेचन केले आहे ते हिंदुस्थानी तत्त्वज्ञानातील सहा दर्शनांपैकी कपिल मुनींच्या सांख्य दर्शनावर आधारित आहे.
थोडं विस्तारानं सांगायचं तर आपल्याकडे सहा प्रमुख दर्शनं म्हणजेच तत्त्वज्ञान पद्धती प्रचलित आहेत. त्या सगळ्या दर्शनांवर इथं बोलणं शक्य होणार नाही, परंतु त्यांचा ओझरता उल्लेख तरी केल्याशिवाय भगवद्गीतेच्या अभ्यासाला पूर्णत्व येणार नाही म्हणून सांगतो. कपिल मुनींचं सांख्य दर्शन, पतंजली मुनींचं योग दर्शन, गौतम मुनींचं न्याय दर्शन, कणाद मुनींचं वैशेषिक दर्शन, जैमिनी मुनींचं मीमांसा दर्शन आणि बादरायण, व्यास मुनींचं वेदांत दर्शन अशी सहा प्रमुख दर्शनं म्हणजेच तत्त्वज्ञान पद्धती प्रचलित आहेत. या सर्व तत्त्वज्ञान पद्धतीमध्ये ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं असल्यामुळे यांना आस्तिक दर्शनं असंही म्हणतात. या सहा दर्शनांव्यतिरिक्त आणखी तीन निरीश्वरवादी दर्शनं हिंदुस्थानी तत्त्वज्ञानात समाविष्ट आहेत. ती म्हणजे चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन व जैन दर्शन. या तीन दर्शनांना नास्तिक दर्शनं असं संबोधलं जातं.
आता आपल्या आजच्या लेखाचा विषय जो सांख्य दर्शनावर आधारित आहे, त्यानुसार पृथ्वी आणि त्यावरील सगळी चेतन-अचेतन सृष्टी ही चोवीस प्रमुख सूक्ष्म पदार्थांतून बनलेली आहे. ज्याला आधुनिक रसायन शास्त्रानुसार एलिमेंट म्हणतात, तेच हे प्रमुख घटक. असो. या तत्त्वज्ञानानुसार मानवी देह हा अनित्य असून त्या देहातील आत्मा मात्र नित्य आहे. हेच तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत.
वासांसि जीर्णानि यथा विहाय। नवानि गृह्णाति नरोपराणि ।।
तथा शरीराणि विहाय जीर्णानि । अन्यानि संयाति नवानि देही ।। 22 ।।
भावार्थ ः ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्रs टाकून नवीन वस्त्रs परिधान करतो त्याप्रमाणे या देहातील देही म्हणजेच आत्मा जुना देह सोडून नवीन देहात प्रवेश करतो.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक
न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुत ।। 23 ।।
भावार्थ ः या आत्म्याला शस्त्रs तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू (विरघळवू ) शकत नाही की वारा याला सुकवू शकत नाही. आपला देह हा पंचमहाभूतांनी निर्माण झालेला आहे. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी (मृत्तिका म्हणजेच जडतत्त्व), आप (पाणी अथवा जलतत्त्व ), तेज (अग्नितत्त्व) वायू ( प्राणवायू तसेच इतरही अनेक प्रकारचे वायू ) आणि आकाश (अवकाश किंवा पोकळी) हा देह पुन्हा त्याच पंचतत्त्वात विलीन होताना त्याच पंचमहाभूतांकडूनच याचा नाश होऊ शकतो. पृथ्वीतील जडतत्त्व शस्त्राने तुटू शकतं, देहातील ज्वलनशील पदार्थ अग्नीकडून जाळले जाऊ शकतात, इतर अनेक पदार्थ पाण्यात भिजून कुजून नष्ट होऊ शकतात आणि जलतत्त्वाचा नाश वायूद्वारा वाळवला जाऊ शकतो, परंतु आत्मा मात्र या सगळ्यापासून अलिप्त असतो.
अच्छेद्य अयम् अदाह्या अयम् अक्लेद्य अशोष्य एव च ।
नित्य सर्वगत स्थाणुः अचल अयम् सनातन ।।24।।
भावार्थ ः हा आत्मा अच्छेद्य ( न तोडता येणारा), अदाह्य ( न जळू शकणारा), अक्लेद्य ( न भिजणारा ), अशोष्य ( न सुकणारा ) असा असून तो नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल आणि सनातन आहे.
अव्यक्त अयम् अचिन्य अयम् अविकार्य अयम् उच्यते
तस्मात एवम् विदित्वा एनम् न अनुशोचितुम् अर्हसि ।।25।।
भावार्थ ः हा आत्मा अव्यक्त म्हणजेच न दाखवता येण्यासारखा अचिंत्य म्हणजेच ज्याबद्दल तर्काने चिंतन करता येणार नाही असा असून तो अविकारी आहे. म्हणूनच हे अर्जुना, तू या आत्म्यासाठी कोणत्याही प्रकारचा शोक करणं उचित ठरणार नाही.
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मन्यसे मृतम्
तथापि त्वं महाबाहो नैवं शोतिचुम् अर्हसि ।।26।।
भावार्थ ः हे अर्जुना, जरी तू या आत्म्याला नित्य जन्मणारा अथवा नित्य मरणारा असं मानलंस तरीदेखील या देहाचं क्षणोक्षणी रूपांतरण होतंच असतं. जीव जन्माला आल्यानंतर हळूहळू वाढतो, तरुण होतो, वृद्ध होतो. तथापि हे रूपांतरण अत्यंत सावकाश होत असल्यामुळे आपल्याला ते चटकन आकळत नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच समजावून सांगताहेत की, तुला जी भीती वाटते आहे की, मी माझ्या आप्त-स्वजनांना कसा मारू? ही भीती अनाठायी आहे. मारणारा तू कोण आणि मरणारे ते कोण? जरी ते मेले तरी मरेल ते केवळ शरीर. आत्मा अमर असल्यामुळे तू आत्म्याचा नाश करू शकत नाहीस. म्हणूनच तू कोणत्याही प्रकारचा शोक करणं योग्य नाही. या श्लोकावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात…
ना तरी हे अर्जुना । नयेचि तुझिया मना ।
जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ।।
तरी येथ कांही। तुज शोकासि कारण नाहीं ।
हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ।।
सनातन हिंदुस्थानी संस्कृती, ज्याला काही जण हिंदू संस्कृती असंही म्हणतात, ही संस्कृती आत्म्यासारखीच अविनाशी आहे. अनेक परकीय आक्रमणं होऊनही अद्यापही हा धर्म टिकून आहे. हा आपला हिंदू धर्म कधीही नष्ट होणार नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा कधीही जन्माला आलेला नाही. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 20व्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणेच ‘न जायते मिऱ्यते वा कदाचन्’ म्हणजेच कधी जन्मलाच नाही आणि कधी मरणारही नाही असा हा धर्म आहे. जरा खोलवर जाऊन विचार केला तर इतर सर्व धर्मांना धर्म संस्थापक आहेत. उदाहरणार्थ, ख्रिस्ती धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त, मुस्लिम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर, पारशी धर्माचे संस्थापक झरतुष्ट, ज्यू धर्माचे संस्थापक अब्राहम. याप्रमाणे विचार केला तर हिंदू धर्माला कुणीही एक विशिष्ट व्यक्ती धर्म संस्थापक म्हणून सांगता येणार नाही. हा धर्म केवळ धर्म नसून ती मानवी जीवन प्रणाली आहे.
पृथ्वीवरचा पहिला जन्मलेला माणूस कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा नव्हता. म्हणूनच तो हिंदू होता असंदेखील म्हणता येऊ शकेल. असो. नश्वर देह आणि त्या देहातील ईश्वर म्हणजेच आत्मा याबद्दल बऱयाच विचारवंतांनी चिंतन केलं आहे. येणाऱ्या लेखातून आपण त्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करू या.