भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रात मोठ्या जाहिराती देऊन काँग्रेस शासित कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत असा खोटा प्रचार करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे हे फेक नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी व महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा मुंबईत पत्रकार घेऊन भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडणार आहेत.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे उद्या शनिवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. काँग्रेस पक्षाने काल गुरुवारी निवडणूक आयोगाकडे भाजपा विरोधात तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस विरोधात अपप्रचार करण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न असून काँग्रेस पक्षाकडून त्याला चोख प्रत्युतर दिले जात आहे.
गेल्या 10 वर्षापासून केंद्रात आणि साडे सात वर्ष राज्यात सत्तेत असून सांगण्यासारखे काही काम केले नाही. कामाच्या नावावर मते मिळणार नाहीत त्यामुळेच भाजपाकडून अफवा पसरवून खोटा प्रचार सुरू आहे. भ्रष्टाचार आणि कमिशखोरीतून मिळालेल्या शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी त्यासाठी सुरू आहे.
पैशाच्या जोरावर महायुतीचा अपप्रचार सुरू आहे. काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगाणा व हिमाचल प्रदेश निवडणुकीत दिलेल्या गॅरंटीची अंमलबजावणी सुरू आहे. या तिन्ही राज्यातील कोट्यवधी लोकांना या गॅरंटीचा लाभ मिळत आहे. काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भाजपाचा खोटाडरडेपणा उघडा पाडून राज्याच्या जनतेसमोर सत्य मांडणार आहेत.