उत्तर प्रदेशात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तब्येत ठीक नसल्याने आई-वडिलांनी 10 वर्षाच्या मुलाला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने मुलाला इंजेक्शन देताच मुलाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना बलिया जिल्ह्यात घडली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.
मनियार येथील अंश नामक मुलगा आजारी असल्याने आई-वडील त्याला स्थानिक खासगी डॉक्टरकडे घेऊन गेले. तेथे फिरोज नामक डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर अंशची प्रकृती खालावली. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यानंतर पालकांनी त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात हलवले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नातेवाईकांनी डॉक्टर फिरोजविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ फिरोजला अटक केली. फिरोजची चौकशी केली असता त्याच्याकडे केवळ औषधं विकण्याचा परवाना होता. इंजेक्शन देण्याचा परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दवाखान्यातून एक सुई, एक सिरिंज आणि मोनोसेफ 500 मिलीची एक रिकामी बाटली जप्त केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.