अजित पवारांसोबत भाजपमध्ये सहभागी झाल्याचा सर्व नेत्यांना आनंद झालेला. कारण ईडीपासून सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ईडीपासून सुटका म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्मच होता, असे विधान छगन भुजबळ यांनी केल्याचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
पुण्यात माध्यमांनी याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांनी आपण अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही असे स्पष्ट केले आहे. ही मुलाखत ज्यांनी छापली त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार आहे.
निवडणुकीचा दिवस जसा जवळ येतोय तसा महत्त्वाचे प्रश्न बाजुला ठेऊन काहीतरी नवीन नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालला आहे. वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दा नाही. छगन भुजबळ तसे काही बोलले नाही. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी ताबडतोब पुढील अॅक्शन घ्यायचे ठरवले आहे, असेही अजित पवार म्हणाले.
भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या अजेंड्यावरही अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. बटेंगे तो कटेंगे सारख्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सहन होत नाही. इतर राज्यात ते चालत असेल. योगी आदित्यनाथ हे भाजप नेते असून एका राज्याचे मुख्यमंत्रीही आहेत. त्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही सरकारमध्ये असलो तरी आमची विचारधारा वेगळी आहे, असेही ते म्हणाले.