एकनाथ शिंदे हे मोदी, शहांच्या पायाशी गहाण पडलेले आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शुक्रवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या गप्पा एकनाथ शिंदे यांनी मारू नयेत. मोदी, शहांच्या कृपेने त्यांनी धनुष्यबाण हातात घेतला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणासह एकनाथ शिंदे मोदी, शहांच्या पायाशी गहाण पडलेले आहेत, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.
ईडीच्या भीतीने अनेकांनी पक्षांतर केले. पण आमच्यासारख्या लोकांचे अख्खे आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेले. आम्ही तोंडावर सांगितलेले आहे की, मरण पत्करू पण शरण जाणार नाही. पण काही कमजोर हृदयाचे लोक असतात. शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
ते प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मोदींसोबतच
सत्ता द्या, मशिदीवरून भोंगे उतरवू असे राज ठाकरे म्हणाले. त्यांचा हा भोंगा आम्ही 20-25 वर्ष ऐकतो आहोत. यासाठी सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोदी, शहा, फडणवीसांबरोबर आहात म्हणजे सत्तेबरोबर आहात. सत्ता येईल, नाही येईल हा पुढचा प्रश्न, पण एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असतो त्यासाठी सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेली 50-55 वर्ष कोणत्याही सत्तेशिवाय अनेकदा आपले अनेक कार्यक्रम राबवले आहेत, असेही राऊत म्हणाले.
…तर संघर्ष होण्याची शक्यता
17 नोव्हेंबर हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवाजी पार्कावर लोक येतील. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेलाच परवानगी मिळायला पाहिजे होती. पण एक दिवस आधी अर्ज दुसऱ्या पक्षाने दिला म्हणून त्यांना ती जागा मिळतेय. संध्याकाळी त्यांची सभा आणि दिवसभर तिथे आमचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या चाहत्यांचा राबता असेल, म्हणजे तिथे त्यांना अडवले जाईल. तसे झाले तर तिकडे खरोखर संघर्ष होण्याची शक्यता वाटते. म्हणून प्रशासनाने वेळीच त्याच्यावरती पावले उचलणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.