डोंबिवली एमआयडीसीतील कावेरी चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. पदपथ व रस्ते अडवून उभारण्यात आलेल्या टपऱ्यांमुळे रहदारीला अडथळा होत आहे. या चौकात खरेदीसाठी येत असलेले नागरिक रस्त्यातच आपली वाहने पार्क करतात. या अतिक्रमणांमुळे या चौकातील अपघातांची संख्या वाढली आहे. हे वाढते अपघात कमी करण्यासाठी पदपथावरील टपऱ्या आणि वाहनांचे बेकायदा पार्किंग हटवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
कावेरी चौकाला डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीचा चौक मानले जाते. या परिसरात दोन शाळा असून विद्यार्थी, पालक, शाळेच्या बस आणि विविध वाहने यांची सतत वर्दळ असते. रहिवाशांसाठी हा चौक खरेदीसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने सकाळपासून ते रात्रीपर्यंत फेरीवाले पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करतात. याशिवाय अनेक नागरिक रस्त्याच्या दुतर्फा व पदपथालगत दुचाकी व चारचाकी वाहने उभी ठेवतात. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे या प्रश्नाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. भरधाव वेगात असलेल्या एका टेम्पोने दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. परिसरातील टपऱ्या आणि फेरीवाल्यांमुळे वाहने चालवण्यात येणारी कसरत अधिकच कठीण बनली आहे. शाळेच्या बसचालकांना देखील फेरीवाल्यांच्या अडथळ्यांमुळे शाळेच्या आवारातून बस बाहेर काढताना अडचणींचा सामना करावा लागतो.
आंदोलन छेडण्याचा इशारा
या समस्येचे निराकरण करण्यासाठी नंदकिशोर परब, तेजस पाटील, मुकेश पाटील, राजू नलावडे, सागर पाटील, गौरव डामरे, अजय घोरपडे, किरण भोसले, संतोष शुक्ला, संजय चव्हाण या जागरूक नागरिकांनी महापालिकेचे आयुक्त आणि ई प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.