मुंबईच्या वेशीवर पर्यटकांचे हाल, कर्जतमध्ये वाहतूक कोंडीने वाहनचालक बेजार

दिवाळीची सुट्टी, भाऊबीज व विकेंडमुळे चारफाटा मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीचा अक्षरशः विचका झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह वाहनचालक बेहाल झाले आहेत. चारही बाजूने मोठ्या संख्येने वाहतूक होत असल्याने चारही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते.

कर्जत तालुक्यात मागील काही वर्षांत विकास कामे झाली म्हणून गवगवा सुरू आहे. मात्र शहरातील मुख्य समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केले आहे. त्यातच अनियोजित कारभारामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. याचाच फटका कर्जतच्या चारफाटा येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसतो.

कर्जत-मुरबाड, कर्जत-कल्याण व मुंबई, पुणे, गोव्याकडे जाण्यासाठी कर्जत-चौक रस्ता हा वाहतूक कोंडीने जाम होतो. शनिवार-रविवार विकेंडला पुणे, गोवा आणि माथेरानला जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावरून मार्ग काढताना स्थानिक वाहनचालकांसह पर्यटकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहराच्या मुख्य चौकात उड्डाण पूल रस्ता तयार झाला तरच वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा… पोलिसांची दमछाक

नेरळ येथील खांडा ते पोलीस ठाणे, 1 नंबर चौक या भागात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अर्धी वाहने भिसेगाव मार्गे वळवली. दरम्यान वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.