फिरकी – ‘डमीं’चा खेळ खल्लास…!

>> बाबासाहेब गायकवाड

विधानसभा निवडणूक रिंगणात नाव, आडनाव आणि चिन्ह साधर्म्य असलेले उमेदवार चर्चेत आहेत. पराभवाची धास्ती घेतलेल्या, पक्ष फोडून तयार झालेल्या गटाने हा खोटारडा डाव खेळला आहे. पण, जनता सूज्ञ आहे. महाविकास आघाडीवरील विश्वास वाढला आहे. यामुळे अजित पवार आणि मिंधे गटाच्या या नकलींचे, त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरविलेल्या, कुठेही गेलो तरी आम्हीच पक्ष अन् आम्हीच जनता असा समज करून घेणाऱया बेगडी टोळीची महा‘गोची’ झाली आहे. या निवडणुकीच्या निकालात यांचं राजकीय अस्तित्त्वच निकाली निघेल, राजकारणातला ‘डमीं’चा खेळ खल्लास होईल.

लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे हे खासदार झाले. त्यांच्याविरुद्ध आडनाव साधर्म्य असलेले बाबु भगरे यांना अपक्ष म्हणून उभे करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे भगरे हे पेशाने शिक्षक असल्याने मतदारसंघात भगरे सर म्हणून ते परिचित आहेत. विरोधकांनी तोच फायदा घेवून बाबु भगरेंच्या मतदान यंत्रावरील नावापुढे पंसात ‘भगरे सर’ असा उल्लेख केला, ट्रम्पेट चिन्ह घेतले. मतदारांची दिशाभूल झाली आणि तिसरी शिकलेल्या डमी भगरे सरांनी एक लाखाहून अधिक मते घेतली. विधानसभा निवडणुकीत मविआच्या उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी हाच कित्ता गिरवला जात आहे. नांदगावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गणेश धात्रक; दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनीता चारोस्कर, नाशिक पूर्वमध्ये गणेश गीते यांच्यासह जिह्यात काही मतदारसंघांमध्ये नाव आणि आडनाव साधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्याची खेळी करण्यात आली आहे. लोकसभेला या प्रयोगाने एखाद्या ‘डमी’ला लाखभर मतं मिळाली असली तरी या निवडणुकीतही तसे होण्याची शक्यता फार कमी आहे.

नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ, सुहास कांदे, दादा भुसे यांच्यासह अजित पवार, मिंधे गटाच्या या उमेदवारांना कोणीही पक्षाचा उमेदवार मानायला तयार नाही. ते त्यांच्या गटापुरते मर्यादित असले तरी त्या गटाशीही ते प्रामाणिक राहतील का, अशी चर्चा होत असल्याने तेही ‘डमीं’च्याच माळेतील मणी मानले जातात. अजित पवार गटाच्या सर्व पदांचा राजीनामा देवून नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढणाऱया समीर भुजबळ यांना स्वतः छगन भुजबळांसह त्यांच्या गटाचा पाठिंबा असल्याचे गुपीत उघड झालेले आहे, त्यांनाही नकली अपक्ष म्हटले जात आहे. महायुतीतील अशा उमेदवारांची ही तऱहा सर्वत्रच आहे.

हे सर्व महाभाग काय अन् कोण आहेत, संधी दिल्यानंतर यांनी कोणतं कर्तृत्व गाजविलं, याचा अनुभव जनतेने घेतला आहे. विकास आणि जनसेवा हा आपला स्वच्छ, सरळ हेतू आहे, असे हे टाहो फोडून सांगत असले तरी यांना यावेळी या निवडणुकीत जनता थारा देणार नाही, हे निश्चित. महायुतीच्या या खोटय़ांचे मुखवटे पराभवाने गळून पडतील. महाविकास आघाडीतील असली पक्षांच्या असली उमेदवारांनाच विजय प्राप्त होईल. येत्या 23 तारखेला सर्वच ‘डमीं’चा खेळ खल्लास होईल.