विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी प्रचार सभा होत आहेत. बीड जिह्यातील राजकारणदेखील नेहमीप्रमाणे रंगात आले आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार व माजी आमदार भीमराव धोंडे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे आहेत, परंतु एका प्रचार सभेत त्यांना आपले निवडणूक चिन्ह आठवले नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना तुतारी वाजवण्याचे आवाहन केले. भीमराव धोंडे हे भाजपचे माजी आमदार असले तरी या वेळी भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून सुरेश धस यांना उमेदवारी दिली. बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख, भाजपचे उमेदवार सुरेश धस आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे हे तिघे रिंगणात आहेत. त्यामुळे आष्टीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.