मनमानी पद्धतीने सध्या कारभार सुरू आहे. मात्र ही परिस्थिती बदलायची असेल तर जनतेनेच आता यांना धडा शिकवला पाहिजे. तर आणि तरच पुढच्या पिढीला कायदा व सुव्यवस्थेच्या राज्यात जगता येईल.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षांचे बॅनर काढले जातात, पक्ष नाव व चिन्ह झाकले जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडीत नियम धाब्यावर बसवून चक्क बॅनर झळकत असल्याचे समोर आले आहे. असे असताना निवडणूक अधिकारी या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संताप व्यक्त केला आहे. शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांनी पालिका अधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. आयोगाचे कॅमेरे, फोटोग्राफर आमच्या मागे मागे फिरतात, पण मिंध्यांचे उघडे बॅनर त्यांना दिसत नाहीत का, असा सवालच त्यांनी केला असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठाण्यात निवडणूक आयोगाच्या दिमतीला मिंध्यांच्या गाड्या वापरल्या जात असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी याबाबतचा व्हिडीओच व्हायरल करत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याबाबत वृत्तपत्रांनीदेखील टीकेची झोड उठवली, परंतु निगरगट्ट प्रशासन थंड असल्याने ठाणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. धक्कादायक म्हणजे आचारसंहिता लागू होताच ठिकठिकाणच्या पालिका क्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, कटआऊट्स तसेच पक्ष कार्यालयांवरील फलक नियमानुसार झाकले जातात. मात्र ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात उघडपणे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या भागातील एका चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे यांचे फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन असूनदेखील प्रशासन त्याकडे जाणीवपूर्व कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत आहे.
आनंद दिघेच्या ठाण्यात ही दडपशाही खपवून घेणार नाही
शिवसेना – महाविकास आघाडीचे कोपरी-पाचपाखाडीमधील उमेदवार केदार दिघे यांनी याची पोलखोल केली असून निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ते म्हणाले, आम्ही रितसर परवानगी घेऊन या भागामध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहोत. हे करताना निवडणूक आयोगाचे अधिकारी, त्यांचे व्हिडीओग्राफर, फोटोग्राफर हे सतत आमच्याबरोबर आहेत. मागे मागे करून चित्रीकरण करीत आहे. मात्र कोपरी पाचपाखाडी चौकातील मिंध्यांचा हा फलक निवडणूक आयोगाला दिसत नाही का? याबाबत विचारल्यानंतर पालिकेचे घटनास्थळावर आलेले अधिकारी हा बॅनर यापूर्वी झाकला होता असे सांगतात. मग झाकलेला हा बॅनर पुन्हा कुणी काढला? यावर काही कारवाई होणार आहे की नाही, असा सवाल करतानाच धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात ही दडपशाही खपवून घेणार नाही असा इशाराच केदार दिघे यांनी दिला.