वांद्रे कुर्ला संकुलातील महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमानी सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. यात ५ गॅरंटीचा समावेश आहे. मविआची सत्ता आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ, तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना 50 हजार रु. प्रोत्साहन, जातनिहाय जनगणना व आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न, कुटुंब रक्षण अंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषधे व बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल.
यावेळी बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आतापर्यंत अनेक गॅरंटी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ अशा गॅरंटी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही, ते साततत्याने खोटे बोलतात. काँग्रेस पक्षाने कर्नाटकमध्ये ज्या गॅरंटी दिल्या त्या पूर्ण केल्या आहेत. मोदींनी फक्त अदानी अंबानींची गॅरंटी पूर्ण केली. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, देशाचे नाक आहे पण भाजपा सरकारने मुंबईला काय दिले याचे उत्तर दिले पाहिजे. लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. फुले, शाहु, आंबेडकरांनी देशाला दिशा दिली पण त्याच महाराष्ट्रात या विचाराला संपवण्याचे काम केले जात आहे. अदानीच्या बंदरातून ड्रग्ज येत आहे ते थांबवले पाहिजे. उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होऊ देऊ नका. शिंदे भाजपाच्या चोरांच्या सरकारला घरी बसवा असे आवाहन खर्गे यांनी केले आहे.