बीकेसी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना जिथल्या तिथे घर देणार, असे आश्वासन दिले आहे. यावेळी बोलताना त्यांनी ”महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अदानींसाठी ज्या निविदा काढून मुंबईला नासावले जातेय ते सर्व निर्णय रद्द करणार असल्याचे सांगितले आहे.
”लोकसभेत जो प्रचार केला त्याला हे फेक नरेटिव्ह म्हणतायत. आपल्याला संविधान वाचावायचे आहे, ते अजून पूर्ण वाचलेले नाही. त्यासाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची आहे. जर संविधान बचाव यांना हे फेक नरेट्विव्ह वाटत असेल तर धारावीचा मुद्दा आम्ही काढतोय. अख्खी मुंबई अदानीच्या घशात घालणारे जे जीआर निघाले आहेत ते फेक नरेटिव्ह होऊ शकतात? एक धारावी वसवण्यासाठी मुंबईतील वीस जागा अदानीच्या घशात घातल्या जातायत. मुंबई संपूर्णपणे अदानीमय करून टाकत आहेत. आम्ही आज जाहीर करतोय आपलं सरकार आल्यानंतर चुकीच्या ज्या निविदा काढल्या गेल्या आहेत. तसेच निविदा काढून ज्या सवलती अदानींना देऊन आमची अख्खी मुंबई नासवली जातेय. पहिले ते सर्व कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द करू व धारावीकरांना जिथल्या तिथे घर दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन आम्ही महाविकास आघाडी म्हणून देत आहोत. विषय फक्त धारावीचा नाही. दहिसर, मुलुंड, कांजूर, मालवणी, मिठागराची जमिन, कुर्ला डेअरीची जमीन दिली आहे. आज आपण पंचसूत्री म्हणून जाहीर केलं आहे. त्यात धारावीचा मुद्दा आमच्या वचननाम्यात असणार आहे. कोरोना काळात आम्ही धारावी वाचवली होती आता पुन्हा एकदा धारावी वाचवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोळी बांधवांच्या मतानुसार कोळीवाड्यांचा विकास करू – उद्धव ठाकरे
” हे सरकार कोळीवाड्यांचं गावठाण भागांचं क्लस्टर डेव्हलपमेंट करणार आहे. कोळीवाडे गावठाण बिल्डरच्या घशात घालायचे प्रयत्न सुरू आहेत. कोळीवाडे गावठण असो कोळीवाड्याचे अस्तित्व कायम ठेवून कोळीबांधवांच्या मतानुसार त्यांचा विकास करून दाखवू. ही निवडणूक केवळ शिवसेनेची, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची नाही. ही मुंबई व महा्राष्ट्राचं जे गुजरातीकरण चाललं आहे ते थांबवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. सगळे कारभार गुजरातला चालले आहेत. दिल्लीत बसलेले लोकं आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जय बोलून षंडासारखे बघत बसणार असू तर न जगलेलं बरं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.