Indian Premier League 2025 साठी लिलाव प्रक्रिया 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरबच्या जेद्दाह शहरामध्ये पार पडणार आहे. या मेगा लिलावासाठी 1,574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. चाहते सुद्धा या लिलावासाठी उत्सुक असून लिलाव प्रक्रियेची आतुरतेन वाट पाहत आहेत. अशातच इंग्लंडचा वेगवान माजी गोलंदाज जेम्स अँडरसनने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्याची उत्सुकता दर्शवत आपली दावेदारी जाहीर केली आहे.
जगातील मातब्बर वेगवान गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्या 42 वर्षीय जेम्स अँडरसनच्या नावाचा समावेश केला जातो. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक तगड्या फलंदाजांचा त्रिफळा उडवला आहे. मात्र, आता हा इंग्लंडच्या पठ्ठ्या आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 1.25 कोटी रुपये या मुळ किंमतीसह त्याने लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. परंतु जेम्स अँडरसन 2014 नंतर एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तसेच आयपीएलमध्ये सुद्धा तो कधी खेळलेला नाही.
जेम्स अँडरसनने जुलै 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्स स्टेडियमवर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अँडरसन इंग्लंड संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडत आहे. असे असताना जेम्स अँडरसनने IPL 2025 च्या लिलाव प्रक्रियेसाठी आपल्या नावाची नोंदनी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अँडरसनने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीमध्ये 19 सामन्यांमध्ये फक्त 18 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे मेगा लिलावात त्याला बोली लावण्यासाठी संघ मालक पुढाकार घेतील का नाही, हे 24 किंवा 25 तारखेला समजेल.