प्रेमभंग, आर्थिक समस्या आणि तांत्रिक बाबा, इव्हेंट मॅनेजरच्या मृत्यूचे रहस्य उलगडले

प्रेमभंग आणि आर्थिक समस्या याला कंटाळून एका इव्हेंट मॅनेजरने आत्महत्या केल्याची घटना भोपाळमध्ये घडली. समर प्रताप सिंग याचा मृतदेह राहत्या घरी त्याच्या खोलीत आढळून आला होता. समरच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नव्हती. त्यामुळे समरने आत्महत्या का केली हे एक रहस्य बनले होते.

समरच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली असता तो एका बाबाच्या संपर्कात असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. अशोका गार्डनमध्ये राहणारा तांत्रिक बाबा आशुतोष आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले. यानंतर पोलिसांनी समरचा मोबाईल तपासला असता समरचे आणि तांत्रिक आशुतोषचे व्हॉट्सअप चॅट पोलिसांना मिळाले.

मरण्यापूर्वी समरने तांत्रिकला शेवटचा मॅसेज केला होता. तुम्ही समस्या सोडवू शकत नाहीत. त्यामुळे माझ्याकडे मरण्याशिवाय पर्याय नाही, असे मॅसेजमध्ये समरने म्हटले होते. व्हॉट्सअप मॅसेजवरून उपाय करण्याच्या नावाखाली आशुतोष समरकडून पैसे घ्यायचा. तसेच स्मशानात बोलावून तांत्रिक पूजा करायचा, याचा खुलासा झाला. मात्र एवढं करूनही समरच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच होत्या. पोलिसांनी आशुतोषविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.